संडे स्पेशल : रात्रप्रशाला देतेय, आकांक्षांना पंख नवे…   

डॉ. सीमा निकम 

देशातील महनीय विचारवंतांनी शिक्षणाचे महत्त्व सतत अधोरेखित केले आहे. महात्मा फुले यांनी तर “विद्येवीना मती गेली…’ असेही सांगून ठेवले आहे. मात्र, घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत आर्थिक स्वावलंबन ही ज्या तरुणाईची प्राथमिकता बनते, तो वर्ग शिकणार तरी कधी? मात्र, शिकण्याची उर्मी आणि जिद्द प्रबळ असेल, तर असे विद्यार्थी रात्रशाळेत शिकून ज्ञानार्जन करत आहेत. चिंचवडमधील अशाच एका रात्रशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची ही कहाणी… 

चिंचवड स्टेशन या भागात “चिंतामणी रात्र-प्रशाला’ नावाची शाळा आहे. एके दिवशी शाळेसमोरून चालत जात असताना माझ्यासमोरून तरुण मुलींचा घोळका, चेहऱ्यावरून दमलेल्या पण शाळेच्या आवारात आनंदाने जाताना दिसला. नकळतपणे त्या मुलींच्या पाठोपाठ मीही त्या शाळेत जाऊन पोहोचले. दिवसा विविध ठिकाणी अर्थार्जन करणाऱ्या आणि रात्रशाळेत ज्ञानार्जन करणाऱ्या या विद्यार्थ्यांना जाणून घ्यायची मोठी उत्सुकता लागली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शाळेच्या कार्यालयात मुख्याध्यापक सतिश वाघमारे यांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. मुलींशी बोलायला सुरुवात केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर ओशाळलेपण स्पष्ट दिसत होते. जेव्हा त्यांना मी हे समजावून सांगण्यात यशस्वी झाले की, मी तुम्हाला कसलेही उपदेशाचे डोस पाजायला आले नसून तुमची मैत्रिण, मोठी बहीण व्हायला; भरपूर गप्पा मारायला आली आहे. हे ऐकताक्षणीच त्यांना हायसं वाटलं.

“माझीही मार्कलिस्ट का नको?’ शिक्षणाला वयाचे बंधन नसते हेच खरे. ललिताचे वडील लहानपणी गेले. लग्न लवकर झाल्यामुळे उदरनिर्वाहासाठी झेरॉक्‍स काढत असतानाच “आपलीही अशीच एखादी मार्कलिस्ट का बरं नसावी?’ असा विचार तिच्या मनात आला. मग या रात्रशाळेची माहिती घेऊन तिनेही आठवीत प्रवेश घेतला; तेही वयाच्या 43 व्या वर्षी! इतक्‍या मोठ्या वयात आपल्या मुलीच्या वयाबरोबरच्या मुलींमध्ये वर्गात बसताना ललिताला कमीपणा नाही वाटला; तर छान मैत्रिणी मिळाल्याचा आनंद मिळाला.

संगीताचे सूर भुरळ पाडतात… 

सोळा वर्षांच्या मनूची आई नगरपालिकेत स्वच्छता कर्मचारी असून वडील रस्त्यावर लिंबे विकतात. दिवसभर घरात काम व संध्याकाळी आठवीच्या वर्गात हजर होणारी मनू दिवसभर लोकांच्या घरी धुणं-भांडी करते, तिचे भाऊ दूध टाकतात. पण अशा बेसूर परिस्थितीतसुद्धा संगीताचे सूर तिला भुरळ पाडतात कारण भविष्यात तिची गायिका होण्याची इच्छा आहे.
पलक आणि रेश्‍माच्या डोक्‍यावरचे आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले आहे. “माय मरो पण मावशी जगो’ या म्हणीला सार्थ ठरल्या दोघींच्या मावश्‍या व त्याच झाल्या दोघींची आई व या भाच्या घर सांभाळतात, पार्टटाईम नोकरी करतात व संध्याकाळी शाळेत येतात. “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हेच खरे. सतरा वर्षांच्या दिव्यांग दामिनीचे वडील ड्रायव्हर तर भाऊ पेट्रोल पंपावर काम करतात.

दामिनी दिवसभर आईसमवेत भाजी विकत बसते. बोलताना जरा अडखळते खरी; पण शिक्षणाच्या विश्‍वासाने दामिनीच्या “शिक्षिका’ होण्याच्या स्वप्नात कोणताच अडथळा येणार नाही, हे तिचे डोळे आत्मविश्‍वासाने सांगतात. नवऱ्यापासून विभक्त झालेली आलिफा आई-वडील व 10 वर्षांच्या मुलीसाठी व त्यांच्या आनंदासाठीच दिवसभर नोकरी करते व दहावीच्या परीक्षेची तयारीही! वैयक्‍तिक जीवनातला अंधार तिने ज्ञानमार्गावर चालताना कधीच मागे टाकला आहे. सोनाली व ईशाचे वडील नसल्यामुळे आई अतिशय अंगमेहनतीचे बिगारी काम करते. आईच्या या जीवापाड कष्टाची जाणीव या दोघींना आहे. त्यामुळेच सकाळचा स्वयंपाक करून सकाळी 8 ते 6 ची नोकरी करून शाळेला येतात. परत शाळा करून घरी आईला मदत करण्यासाठी तयार.

शिकण्याची जिद्द मोठी

बहुतांश मुलींच्या घरी वडील दारूच्या व्यसनात बुडालेले, आई चार घरची धुणी-भांडी करणारी, या मुली 8 ते 10 तास कष्टाची कामे करतात, कोणी मेडिकलमध्ये कोणी केटरर्समध्ये, एखादी ज्योती इलेक्‍ट्रिक जॉब बनवून नावाप्रमाणे भविष्य उजळण्याचा प्रयत्न करताना दिसते.

कुठून येते एवढी हिंमत? एवढी ताकद? एवढी जिद्द? चेहऱ्यावर थकवा नाही, ना फेशियलचा ग्लो, ना उंची कपड्याचा भपकेबाजपणा; साधी राहणी, निर्मळ मन व वृत्तीचा प्रामाणिकपणा हाच सौंदर्याचा परिपाक असावा, याची अनुभूती आली. अर्थात, याचे श्रेय आहे ते इथल्या सर्व शिक्षकांचे. एक मोठं कुटुंबच तयार झालंय. आलेली परिस्थिती त्यांनी खुल्या दिलाने स्वीकारली आहे. लहानपणापासून जगण्याचा संघर्ष करत आल्या, आता शिक्षणासाठी करत आहेत. आपल्या
दुःखाचे भांडवल करण्याची इच्छा नाही, की कोणाची सहानुभूती मिळावी ही अपेक्षा नाही. आयुष्यात जे मिळाले नाही त्याची यादी बहुधा मोठी असेलही पण जे मिळालंय त्याकडे समाधानाने बघण्याची दृष्टी निश्‍चितच आहे.
यांना प्रेरणा मिळवण्यासाठी कुठल्याही प्रशिक्षण, कार्यशाळेची गरज नाही. जीवनातले इतके कटु, कठीण, दुःखद प्रसंग सांगताना मनातील दुःख डोळ्यात दिसते खरे पण त्या

दुःखाला व त्यातून येणाऱ्या अश्रूंना वाहून देता डोळ्यांच्या कड्यातच बांधून ठेवण्याची संयमित वृत्ती शिकण्यासाठी कुठल्या ङळषश लेरलह ची गरजच नाही. याच मुली उद्या कलेक्‍टर, अधिकारी, डॉक्‍टर, इंजिनिअर होतील व ज्या समाजाने त्यांना कधी आपलं मानलंच नाही, त्या समाजाची सेवा करण्यासाठी समज होतील. तेव्हा प्रत्येकाचाच ऊर आनंदाने भरून येईल.
“माणूस’ म्हणून जगण्याचा आनंद मिळेल,
“सुशिक्षित’ म्हणवण्याचा अधिकारही मिळेल,
ऊठ, तुझ्या स्वप्नांना बळ मिळू दे,
शिक्षणाच्या परीस स्पर्शाने जीवन उजळू दे,
शाळा दिवसाची असो अथवा रात्रीची,
तुला माणूस समजण्याची दृष्टी मिळू दे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)