#संडे स्पेशल: क्रीडाक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराने भविष्य उज्ज्वल

डॉ. मेघश्री दळवी

इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे आशियाई क्रीडास्पर्धा रंगात आल्या आहेत. आजवर ऍथलेटिक्‍ससारख्या स्पर्धांत मागे असलेले भारतीय खेळाडू पदकांमागून पदके हस्तगत करत आहेत. विख्यात भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या सन्मानार्थ नुकताच देशभर राष्ट्रीय क्रीडादिन साजरा झाला. खेळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर योग्य प्रकारे झाल्यास खेळाडूंना उत्तुंग यश कसे मिळवता येते, याचाच संदेश आशियाई स्पर्धांच्या निमित्ताने मिळत आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या रोजच्या आयुष्यातलं अविभाज्य अंग झालेलं असताना विविध खेळ तरी कसे मागे राहतील? क्रीडाविश्‍वात तंत्रज्ञानाने आता पूर्ण मुसंडी मारलेली दिसते. नानजिंगच्या बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावलं. सध्या जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धा, त्यापाठोपाठ कोरियातल्या शूटिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा होतील. शिवाय इंग्लंडबरोबरचे क्रिकेट सामनेही सध्या रंगत आहेत. या सर्वच ठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कसा समर्पक वापर करण्यात येत आहे, ते समजून येईलच. जुलै महिन्यात विंबल्डन, “फिफा वर्ल्ड कप’ अशा अनेक सामन्यांचा आपण मनमुराद आनंद घेतला. त्यातही “फिफा’मधला व्हिडिओ असिस्टन्ट रेफरी (व्हीएआर) आठवतो का? मैदानात एका बाजूला पूर्ण व्हिडिओ बघून रेफरी आपले निर्णय योग्य आहेत का, हे पडताळून पाहात होते. फुटबॉल विश्‍वचषकात हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरलं गेलं आहे.

त्याआधी सन 2014 च्या विश्‍वचषकामध्ये “गोल लाइन’ या तंत्राचा पहिल्यांदाच अंतर्भाव करण्यात आला होता. चौदा अति वेगवान कॅमेरे वापरून बॉल गोलरेषेच्या पलीकडे नेमका कधी गेला, याचा अचूक निर्णय या तंत्राने अवघ्या एका सेकंदात मिळतो. “हॉक-आय’ नावाने ओळखलं जाणारं हे तंत्रज्ञान क्रिकेट किंवा टेनिसमध्ये नेहमी वापरले जाते. वास्तविक, “फिफा’ने ते तंत्रज्ञान वापरायला जरासा उशीरच केला, पण फुटबॉलचे चाहते गोलबाबत अगदीच उतावीळ असल्याने, हे तंत्रज्ञानही आता अत्यावश्‍यक होऊन बसलं आहे.

प्रतिस्पर्ध्याच्या खेळाचं विश्‍लेषण करायला व्हिडिओ पुनःपुन्हा पाहणे हे तंत्र आता खूपच जुनं झालं आहे. सध्या त्याला “ऑगमेंटेड रिऍलिटी’ची जोड देऊन किमान हजार प्रकारांनी विश्‍लेषण करता येतं. त्यामुळे कोणत्याही स्पर्धेत दोन्ही बाजू तगड्या अभ्यासानिशीच मैदानात उतरताना दिसतात. प्रशिक्षण आणि सराव यावेळीही खेळाडू “व्हर्च्युअल रिऍलिटी’ आणि “ऑगमेंटेड रिऍलिटी’ची सर्रास मदत घेताना दिसतात.

“आईस हॉकी’मध्ये वापरली जाणारी हेल्मेट्‌स हाय-टेक होत आहेत. खेळाडूंची टक्‍कर झाली की, या हेल्मेटमधले संवेदक धक्‍क्‍याची नोंद घेतात आणि आतील चुंबकाच्या विशिष्ट रचनेने त्याचा प्रभाव अधिकाधिक पृष्ठभागावर पसरेल, अशी व्यवस्था करतात. त्यामुळे खेळाडूंना कमी इजा होते आणि त्यांचं डोकं जास्त सुरक्षित राहातं. ही “स्मार्ट हेल्मेट्‌स’ झालेल्या प्रकाराची माहिती तत्काळ आपल्या टीमकडे पोहोचवते. मग तिथले डॉक्‍टर आणि प्रशिक्षक खेळाडूच्या दुखापतीचा अंदाज बांधतात. त्यामुळे गरज पडल्यास खेळाडूला परत बोलावून तातडीने उपचार करता येतात. अशी हेल्मेट्‌स वापरायला सुरुवात झाल्यापासून गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये खेळाडूंच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग कमी व्हायला लागले आहेत.

इतर क्षेत्रांत जशी अधिकाधिक डेटा मिळवायची धडपड दिसते, तशी आता क्रीडाप्रकारांमध्येही दिसते. क्रिकेटमध्ये स्टंप्स, हेल्मेट यावर कॅमेरे लावलेले असतात. तर अमेरिकन फुटबॉलमध्ये खेळाडूंच्या शोल्डरपॅडच्या आत “रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग (आरएफआयडी)’ घालायला सुरुवात झाली आहे. स्टेडियममध्ये जागोजागी लावलेल्या संवेदकांकडून या टॅगची नोंद करून खेळाडूंच्या हालचालींची अचूक माहिती मिळवली जाते. सोबत त्यांचा वेग, ते किती तत्परतेने बॉलचा ताबा घेतात, त्यांच्या छातीचे ठोके, हेही मोजलं जातं. या डेटाचा वापर करून मग खेळाचे डावपेच आखले जातात.

आईस स्केटिंग, बॉबस्लेडिंग, धावण्याच्या शर्यती, मॅरथॉन, सायकल शर्यती अशा खेळांमध्येही सध्या “सेन्सर्स’द्वारा भरपूर डेटा मिळवला जातो. लांब पल्ल्‌यांच्या शर्यतीत “रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग’ने खेळाडूंचा ठावाठिकाणा अचूक मिळवता येतो. अलीकडे या शर्यतींमध्ये खेळाडू एक “गिळायचा संवेदक’ वापरायला लागले आहेत. हा संवेदक थेट पोटात जाऊन शरीराच्या आतल्या अवयवांची क्षणोक्षणी नोंद घेऊन बाहेर कंट्रोल युनिटला पोहोचवतो. त्यामुळे खेळाडूंचं आरोग्य धोक्‍यात तर येत नाही ना, याची सतत खात्री करून घेता येते.

ऍथलेटिक्‍समध्ये एक शतांश सेकंदालाही प्रचंड किंमत आहे. त्यामुळे तिथे खेळाडूंची तंदुरुस्ती अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी परिधानीय तंत्रज्ञान (वेअरेबल टेक्‍नॉलजी) पुष्कळ प्रमाणात वापरलं जातं. ही परिधानीय हेल्थ ट्रॅकर साधनं हातावर, मांडीवर किंवा कपाळावर बांधली जातात. झालंच तर कपड्यांमध्ये, बुटांमध्ये, टोप्या, हेल्मेट यामध्येही लावता येतात.
दिवसभरचा व्यायाम, चाललेलं अंतर, पायऱ्यांची चढ-उतार, वजन, स्नायूंची ताकद, पोटात गेलेल्या कॅलरीज, पाण्याचं प्रमाण, रक्‍तातील ग्लुकोजची पातळी, शरीरातील स्नायूंचं आणि चरबीचं प्रमाण, शरीराचं तापमान, रक्‍तदाब, हृदयाचे ठोके अशा डेटाची रेलचेल या साधनांमधून मिळते. त्यावरून मग खेळाडूचा आहार, व्यायामाचे प्रकार, सरावाचा कालावधी अशा गोष्टी निश्‍चित करून त्याच्याकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेता येते.

प्रत्यक्ष खेळात तंत्रज्ञानाचा सहभाग वाढतो आहे, तसाच हे खेळ प्रेक्षकांपर्यंत नेण्यातही. “ऍमॅझोन’ आणि “डिस्नी’ या बड्या कंपन्यांनी स्पोर्टस टेक्‍नॉलजीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केलेली आहे. खेळाचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्ट्रीमिंग) करण्यासाठी हल्लीच ऍमॅझोनने 20 प्रिमियर लीग सॉकर खेळांचे हक्क विकत घेतले आहेत; तर तिकडे फेसबुकने 25 प्रिमियर लीग बेसबॉलचे हक्क घेतले आहेत. आयपीएलमध्येही फेसबुकला रस होताच. हे खेळ आता टीव्हीच्या पडद्यावर नाही तर मोबाईल, टॅब, आणि लॅपटॉपवर ऑनलाइन पाहिले जाणार, याची ही नांदी आहे. आजचे स्मार्ट टीव्ही, डिश अँटेनापेक्षा वायफायवर अवलंबून असतात!

फेब्रुवारी 2018 मध्ये दक्षिण कोरियात हिवाळी ऑलिंपिक पार पडलं. त्यात विमानतळापासून “रोबॉट्‌स’ दिसत होते. ते सामान उचलायला, मार्ग दाखवायला मदत करत होते, उत्तम भाषांतर करत होते. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमधून आलेले खेळाडू आणि प्रेक्षक खूप खूश होते. मग पुढे स्वयंचलित बस, ड्रोन्स, मैदानात 360 अंशातून खेळांचं चित्रण, “टाइम-स्लाइस’ तंत्राने महत्त्वाचे क्षण रोखून ते जणू प्रत्यक्ष तिथे असल्यासारखे अनुभवणे हे सगळं खरोखरीच अनोखं होतं. हे ऑलिंपिक तंत्रज्ञानाने भरपूर गाजवलं. आता 2020 च्या टोकियो ऑलिंपिकमध्येही रोबॉट्‌स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान बहार उडवून देणार आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक हळूहळू या सगळ्या बदलाला सरावत आहेत. नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत करत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षांत क्रीडाक्षेत्राचं रूप पालटून गेलेलं दिसेल हे निश्‍चित!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)