‘संजीवनी’ शिक्षणाचं मिनी विद्यापीठ

संजीवनीमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात चमकत आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रक्रमांकाने नावलौकिक असलेली शिक्षण संस्था म्हणून कोपरगावच्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचा उल्लेख होत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना करिअरच्या यशस्वी वाटा दाखविण्याचे महान कार्य केले जाते. एकाच छताखाली विविध प्रकारचे शिक्षण देणारी ही संस्था म्हणजे शिक्षणाचं मिनी विद्यापीठ आहे. ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक पद्धतीचे दर्जेदार शिक्षण देऊन त्यांच्या जीवनाला नवसंजीवनी देण्याचे काम येथे केले जाते. सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या सुप्त गुणांचा आविष्कार जगाच्या पाठीवर दाखविण्याची कुशलता येथे निर्माण केली जाते. मोठ्या शहराच्या तुलनेत ही संस्था एक पाऊल पुढे जाऊन सर्व सुविधांनी परिपूर्ण शिक्षण प्रणाली सुरू केली आहे.

या संस्थेत साक्षात सरस्वतीचा सहवास असल्याचा भास शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि येथे सेवा देणाऱ्या प्रत्येकांना होत असावा. ग्रामीण भागातील सर्वाधिक लोकप्रिय शिक्षण संस्था म्हणून संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेची विशेष ओळख आहे. या शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून संस्थेची निर्मिती करताना ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकऱ्यांच्या मुलांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी संजीवनी नावाचे शिक्षणरूपी रोपटे लावले. त्यांच्या शुध्द कल्पनेला संपूर्ण कोल्हे परिवारातील प्रत्येकाने सिंचनरूपी शिक्षणसेवा करून सामान्य माणसापर्यंत रुजविण्याचे काम केले.

दोन तपापूर्वी लावलेल्या संजीवनी शिक्षण रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. शिक्षणरूपी सेवा देण्यासाठी कोल्हे परिवारातील तिसरी पिढी हे महान कार्य अविरत करीत आहेत. उजाड झालेल्या कोपरगाव तालुक्‍याला शिक्षणाच्या रूपाने फुलविण्याचे सामाजिक कार्य सुरू आहे. या संस्थेमधून अभियांत्रिकी शिक्षणामुळे लाखो विद्यार्थी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून पदवी व पदविका शिक्षण दिले जाते.

या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी देशासह राज्यातील अनेक विद्यार्थी प्रयत्न करीत असतात. परिपूर्ण शिक्षण प्रणाली येथे राबविली जाते. उत्कृष्ट निकालाची परंपरा प्रत्येक विभागाची कायम आहे. अभियांत्रिकी शिक्षणामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलक्‍ट्रिकल, कॉम्प्युटर, इलक्‍ट्रिकल्स ऍन्ड टेलिकम्युनिकेशन याचे शिक्षण दिले जाते. मुलांना शिकविण्यासाठी येथे आधुनिक वर्कशॉप, प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, बांधकाम विभागाच्या साहित्यांची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा आहे. वेगवेगळ्या कार्यशाळा भरवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन सक्षम केले जाते. डिप्लोमा व डिग्रीसाठी स्वतंत्र वर्कशॉप आहेत. अनेक छोटेमोठे साहित्य याच ठिकाणी तयार केले जातात.

संजीवनीमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला विद्यार्थी जागतिक स्पर्धेत पाठीमागे राहत नाही. शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी देशासह जगातील अनेक कंपन्यांशी महाविद्यालय संपर्क करून देते. दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचे काम संस्था करीत असते. संस्थेमध्ये औषधे निर्माणशास्त्र विभागाचे पदवी व पदविका स्वतंत्र विद्यालय आहे. दरवर्षी शेकडो विद्यार्थी ही पदवी संपादन करून आपल्या जीवनात यशस्वी होत आहेत. येथे अनेक औषधांवर संशोधन केले जाते. व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी व शिक्षणाच्या बाजारपेठेत संजीवनीचा विद्यार्थी कमी पडू नये यासाठी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेत एम.बी.ए. या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देत ह्युमन रिसर्च व फायनन्स शाखा सुरू केल्याने संजीवनीचा विद्यार्थी वितरण व व्यवस्थापन क्षेत्रात चकमत आहेत.

व्यावसायिक शिक्षणाबरोबर इतर शिक्षणामध्ये संजीवनीचा विद्यार्थी पाठीमागे पडणार नाही याची दक्षता कोल्हे परिवाराने घेतली आहे. संजीवनी उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करून 11 वी, 12 वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध केले आहे. येथूनच डॉक्‍टर, इंजिनिअरच्या पूर्व परीक्षांची तयारी करून घेतली जात असल्याने एकाच छताखाली सर्व प्रकारचे शिक्षण देणारे हे मिनी विद्यापीठ आहे. देशसेवेची बालवयापासून विद्यार्थ्यांना आवड निर्माण करून सैनिकी शिक्षणाच्या माध्यमातून देशसेवेसाठी जाणाऱ्या मुलांना सुदृढ व बळबट केले जाते. संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये पाचवीपासून बारावीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन हजारो विद्यार्थी देशसेवेत रुजू केले आहेत. पुस्तकी अभ्यासाबरोबरच सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण येथे दिले जाते. सर्व प्रकारचे प्रशिक्षण, कसरती, खेळ, रायफल शुटिंग, शिस्त, कवायत, ध्यान, योगा यांचे शिक्षण देऊन सक्षम केले जाते. म्हणूनच संजीवनी सैनिकी स्कूलचा विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो.

शिक्षण क्षेत्रातील बदलामुळे कोपरगावच्या संजीवनी शिक्षण संस्थेने आधुनिक जगाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकत अत्याधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी संजीवनी ऍकॅडमीची सुरुवात करून खारघर, नवी मुंबईच्या धर्तीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण सुरू केले. जे कोठे नाही ते येथे आहे. कमी काळात लोकप्रिय झालेल्या संजीवनी ऍकॅडमीमध्ये एलकेजी, युकेजी ते पहिलीपासून पुढील सर्व वर्गांचे शिक्षण दिले जाते. येथे मुलांना सर्व प्रकारचे शिक्षण लहान वयात देऊन सक्षम बनविण्याचे काम संस्थेच्या संचालिका मनाली कोल्हे यांच्या माध्यमातून होत आहे. संजीवनी इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षणाची दारे खुली केली आहेत.

कोपरगाव तालुक्‍याबरोबरच पालकांच्या मागणीवरून अनेक शेजारच्या तालुक्‍यांत संजीवनी अॅकॅडमीच्या शाखा सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातील आदिवासी, गरीबांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी त्यांच्या शिक्षणाची खास व्यवस्था केली. अनेक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. आदिवासींसाठी टाकळी येथे सुसज्ज शाळा सुरू केली. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था केल्याने त्यांचा सहवास शहरात वाढला आणि अभिमानाने जगण्याची ऊर्जा त्यांच्यात उपलब्ध झाली. कोपरगाव तालुक्‍यातील नाटेगाव, पढेगाव, सुरेगाव व कारवाडी येथे 10 वीपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली.

संजीवनी ई-बसच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षण घेणारा विद्यार्थी संगणकाच्या दुनियेत सामील झाला. संजीवनीने तालुक्‍यातील प्रत्येक शाळेत ई-बस पाठवून मुलांना संगणकाचे प्रशिक्षण मोफत देत आहे. ई-बसमुळे शेकडो विद्यार्थी संगणकाचे प्रशिक्षण घेऊन जगाशी जोडले आहेत. संजीवनीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच खेळाचे धडे देऊन विविध प्रकारचे मैदानी, सांघिक व वैयक्तिक खेळाचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्फत दिले जाते. तालुका पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत शेकडो विद्यार्थी विविध खेळांमध्ये देदीप्यमान यश संपादन करीत आहेत. अनेक विद्यार्थी सुवर्णपदक विजेते ठरले आहेत. विद्यापीठात संजीवनी महाविद्यालय सर्व क्षेत्रात आघाडीवर आहे.

संस्थेचे विश्‍वस्त सुमित कोल्हे यांच्या सहकार्याने संजीवनी युवा स्पोर्टच्या माध्यमातून खेळाडूंना सर्व प्रकारच्या सुविधा देऊन सहकार्य केले जाते. संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्यकारी विश्‍वस्त अमित कोल्हे प्रत्येक विभागावर लक्ष ठेवून असतात. संजीवनीच्या सर्व विभागातील शिक्षण पद्धतीत आधुनिकता आणतात. शैक्षणिक बाजारपेठेत नवीन येणारी प्रत्येक गोष्ट या संस्थेत उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. म्हणूनच संजीवनी एक पाऊल पुढे जात आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनही दिले जाते.

औद्योगिक, संरक्षण, अभिनय, कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, साहित्य, पत्रकारिता या क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींचे मार्गदर्शन, व्याख्याने देऊन मुलांमध्ये ऊर्जा निर्माण केली जाते. म्हणून येथे शिकणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होतो. त्यांच्या अंगी संस्कार, संस्कृती, कला, क्रीडा, वक्‍तृत्व, संशोधन, साहित्य, समाज बांधिलकी यांची बिजे रुजविल्याने आयुष्याच्या खडतर वाटेवर संजीवनीचा विद्यार्थी यशस्वी होतो. येथे शिक्षण घेणाऱ्या मुलांबरोबर त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना संस्था अधिक दर्जाचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असते. म्हणूनच या संस्थेतील प्राध्यापक शैक्षणिक कार्यात प्रभावशाली आहेत.

अनेक प्राध्यापक विद्यापीठाच्या संशोधन मंडळावर कार्यरत आहे. साहित्यामध्ये अनेक शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लिहिलेले पुस्तके राज्य व देशपातळीवर गाजले आहेत. संस्था स्वखर्चाने प्राध्यापक व शिक्षकांना त्यांच्या गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी देश-विदेशात पाठवीत असते.

कोपरगावच्या वैभवात भर टाकणारी संस्था..
उच्चविद्याविभूषित शिक्षकांमुळे संजीवनीचे विद्यार्थी शिक्षणातील अनेक विक्रम पार करीत आहेत. संस्थेत काम करणारे शिक्षक, कामगार यांच्यासाठी संस्था विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांच्या प्रगतीला हातभार लावत असल्याने कर्मचारी वर्ग समाधानी आहे. येथे शिकवणारे शिक्षक मुलांना स्वतःच्या मुलाप्रमाणे शिक्षण देतात. मुले-मुली, शिक्षक व इतर कर्मचारी यांच्या राहण्याची व जेवणाची विशेष सुविधा येथे आहे. मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने पालकांची चिंता मिटवण्याचे काम संजीवनी शिक्षण संस्थेने केले आहे.

हिरवळीने नटलेला शांत, प्रसन्न आणि प्रशस्त महाविद्यालय परिसर, आधुनिक सुविधांनी युक्त परिपूर्ण भव्य इमारती, क्रीडांगणे, संपूर्ण परिसर सीसीटीव्हीमध्ये बंदिस्त, चोख सुरक्षा व्यवस्था, सर्वांगसुंदर व सुरक्षित अशी ही शैक्षणिक संस्था कोपरगाव तालुक्‍याच्या वैभवात भर टाकणारी आहे. आमदार स्नेहलता कोल्हे, संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष व साईबाबा संस्थान, शिर्डीचे विश्‍वस्त बिपीन कोल्हे यांची प्रेरणा व मार्गदर्शन संस्थेला लाभत असते. कोल्हे परिवाराची तिसरी पिढी या शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करीत आहे.

अमित कोल्हे यांचे उत्तम व्यवस्थापन हे या महाविद्यालयातील यशाचे रहस्य आहे. त्यांना मनाली अमित कोल्हे, सुमित कोल्हे, विवेक कोल्हे यांची साथ आहे. संस्थेचे प्राचार्य, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनमोल मेहनतीच्या बळावर संस्थेचा आलेख उंचावत आहे. या यशस्वी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेक विद्यार्थी, पालक प्रयत्नशील असतात. शिक्षण क्षेत्रातील यशस्वी मार्ग दाखवणारी शिक्षण संस्था म्हणजे संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्था अशीच ओळख सर्वांना झाली आहे.

 

शंकर दुपारगुडे

कोपरगाव 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)