संघ हा परिवार नाही, तर तो जातीयवाद्यांचा अड्डा -कन्हैया कुमार

पुणे  (प्रतिनिधी) – संघ हा परिवार नाही, तर तो जातीयवाद्यांचा अड्डा आहे. लोकांनी शिक्षण घ्यावे हेच मुळी या हिंदुत्ववादी सरकारला वाटत नाही. लोक शिकले की ते प्रश्न विचारतील आणि यांना तेच नको आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण भगवे करणे, हे मोठ्या शिताफीने चालले कार्य आहे. मात्र आपल्याला प्रश्न विचारावेच लागतील. मग भले सरकार आमच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करू देत, आम्ही लढू आणि जिंकू देखील अशा शब्दात दिल्लीच्या जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने हिंदुत्ववाद्यांवर शनिवारी तोफ डागली.
वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे ‘संविधान की संघ’ या विषयावरील खुल्या चर्चेत कन्हैय्याकुमार बोलत होता. या वेळी जिग्नेश मेवानी, शेहला रशीद, तेहसीन पुनावाला उपस्थित होते.
कन्हैय्या म्हणाला, भारत देश हा ‘राज्यांचा संघ’ आहे, हे आम्ही शिकलो आहोत, पण सध्या अचानक ‘नागपूरचा संघ’ कसा मोठा झाला? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधाव लागेल. ज्या भूमीत डॉ. आंबेडकर जन्मले त्याच भूमीत हिंदुत्ववादी सावरकर सुद्धा जन्मतात, हेच मोठं गमतीशीर आहे. मात्र, लोकशाहीधिष्ठित आणि संवैधानिक राष्ट्र हे आंबेडकरांच्या आधारे बनवायचे की सावरकरांच्या आधारे, हे आता आपणच ठरवण्याची वेळ आली आहे. ‘मोदी चालीसा’ लिहिणाऱ्यांना आज महत्त्वाची पदे दिली जात आहेत. चड्डी परिधान करून देशाचे भगवीकरण केले जात आहे. मला प्रश्न पडतो की हे चड्डी आणि हाती काठी घेऊन ‘आयएसआय’शी कसे लढणार आहेत? स्वतः अर्धी चड्डी घालणारे महिलांच्या डोक्‍यावरचा पदर का ढळू देत नाहीत? असा प्रश्‍न त्याने उपस्थित केला. यांच्या मनात नव्हे, हत्यारांत राम आहे असे सांगत कन्हैयाकुमार म्हणाला, शबरीची बोरं ज्यांनी उष्टी खाल्ली त्या रामाचे मंदिर बनवणार की केवळ हिंदुत्वाचे प्रतीक असणाऱ्या रामाचे? देशद्रोहाच्या एकाच खटल्यात मी हिंदू आणि उमर खालिद मुसलमान होता. पण,केवळ मुस्लिम असल्याने उमरला अधिक त्रास भोगावा लागला. भारतात म्हणे पुष्पक विमानं बनायची त्याच प्राचीन काळात चक्क ‘आयफोन’ सुद्धा तयार केले जायचे असा टोला लगावत आता मोदी म्हणजे धोनी आणि योगी म्हणजे विराट कोहली. आता मोदींनी आपली भूमिका बदलली आहे. त्यांना आता नेहरूंच्या नंतरचे ‘शांतिदूत’ बनायचे आहे अशी टिका केली.
शेहला म्हणाली, “आपली घटना ही मुळात रुढीवादाचा विरोध करते. पण हिंदुत्ववादी त्याचाच पुरस्कार करतात. नुकतेच वेंकय्या नायडू यांनी ‘आझादी’ शब्दावर बंदी आणण्याचे वक्तव्य केले होते. मला विचारायचे आहे ‘आझादी’ शब्दावर बंदी आणणार तर मग घटनेतील फ्रीडम शब्दाचे काय कराल ? मुसलमानांवर अतिरेकी म्हणून शिक्के मारताना जरा हिंदूंनी केलेल्या अतिरेकबद्दल सुद्धा बोलले पाहिजे. आज मंदिर कुठे बनेल, यापेक्षाही रुग्णालय कुठे बनेल, शाळा कुठे बनेल, महिला सुरक्षित राहतील अशी जागा कुठे बनेल, हे प्रश्न विचारण्याची वेळ आल्याचे तीने नमुद केले.  मेवानी म्हणाले, घरवापसीच्या आधी गावकुसाबाहेर असणाऱ्या दलितांची आधी ‘गाववापसी’ करा. मोदी सरकारच्या काळात सेक्‍युलर आणि सोशालिस्ट ऐवजी ‘हिंदुवादी’ आणि कॉर्पोरेट कंपन्यांच्या हातातील संविधान लागू करण्याचे प्रयत्न दिसतात. यात बदल होण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारावे लागणार आहे. ‘गाय की पूंछ आप रखो, हमे ब्राह्मणवाद से मुक्ती दो’ हाच उद्याचा नारा असणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)