संघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख जाहीरनाम्यात नाही : कॉंग्रेसचे स्पष्टीकरण 

जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून विपर्यास 

भोपाळ: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख मध्यप्रदेशातील आमच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नसल्याचे स्पष्टीकरण कॉंग्रेसकडून देण्यात आले आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपकडून संबंधित विपर्यास केला जात असल्याचा आरोपही कॉंग्रेसने केला आहे.

मध्यप्रदेश कॉंग्रेसने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा (वचनपत्र) प्रसिद्ध केला. त्यावरून राजकीय वातावरण तापले. कॉंग्रेस भगवान श्रीरामांना आणि संघाला विरोध करत असल्याचे टीकास्त्र भाजपने त्या जाहीरनाम्याचा आधार घेऊन सोडले. मध्यप्रदेशात सत्तेवर आल्यास संघावर बंदी घालण्याची घोषणा कॉंग्रेसने जाहीरनाम्यातून केल्याचे वृत्तही पसरले. मात्र, ते वृत्त कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल नाथ यांनी सोमवारी फेटाळून लावले. संघावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख आमच्या जाहीरनाम्यात करण्यात आलेला नाही.

बंदी घालण्याचा आमचा इरादाही नाही. जनकल्याणाच्या मुद्‌द्‌यांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप हेतूपूर्वक संघाचा मुद्दा पुढे करत आहे, असा आरोप नाथ यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. आमच्या तोंडी शब्द घालण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

सरकारी आस्थापनांच्या आवारात संघाच्या शाखा भरवण्यावर बंदी घालण्यात येईल. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांना शाखांमध्ये भाग घेऊ दिला जाणार नाही, असे कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. त्याकडे नाथ यांनी लक्ष वेधले. कॉंग्रेस सरकारने 1981 मध्ये मध्यप्रदेशात सरकारी आस्थापनांच्या आवारात संघाच्या शाखा भरवण्यावर बंदी घातली होती. त्या बंदीच्या निर्णयाला 2000 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी पुनरूज्जीवन दिले. त्यानंतर उमा भारती आणि बाबूलाल गौड या भाजप मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात ती बंदी कायम राहिली. मात्र, संघ राजकीय नव्हे तर सामाजिक-सांस्कृतिक संघटना असल्याचे नमूद करत विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 2006 मध्ये ती बंदी उठवली. संघ कुठल्या प्रकारची संघटना आहे ते जनताच ठरवेल. आम्हाला त्यात पडायचे नाही, असे नाथ यांनी पुढे बोलताना म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)