संघाचा विचार राज्यातून उखडून फेकूया – पृथ्वीराज चव्हाण

आ . पृथ्वीराज चव्हाण : कराड-दक्षिण मधूनच निवडणूक लढणार

सातारा – आगामी निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार राज्यातून उखडून फेकू व पुन्हा एकदा बहुजन समाजाचे सरकार सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दरम्यान, आपण पुणे, सांगली अथवा नागपूर लोकसभा लढणार असल्याच्या चर्चा निरर्थक असून कराड-दक्षिण विधानसभा मतदारसंघातूनच लढणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.


कॉंग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ.मोहनराव कदम, माजी खासदार व ज्येष्ठ नेते हिंदुराव ना.निंबाळकर, युवक जिल्हाध्यक्ष रतन शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, रजनी पवार, नम्रता उत्तेकर यांच्यासह पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, भाजपच्या निमित्ताने देशावर बुरसटलेल्या विचारांचे संकट आले आहे. येत्या काळात हेच सत्तेत राहिले तर महापुरूषांनी घडविलेला इतिहास राहिल की नाही, हा प्रश्‍न आता निर्माण होवू लागला आहे. प.बंगालमध्ये केंद्र व राज्य सरकारमध्ये चाललेला असा संघर्ष आजपर्यंत देशाने कधीही पाहिला नव्हता. भाजपला राज्यघटना उध्दवस्त करून देशातील लोकशाही नष्ट करायची आहे. त्यांना रोखण्यासाठी देशातील 22 पक्षांना एकत्र आणण्याचे काम राहुल गांधींनी केले आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे त्यांचे उत्तर भारतातील तब्बल शंभर पेक्षा जास्त खासदारांची संख्या कमी होणार आहे.

येत्या काळात कॉंग्रेसचे सरकार आले तर लोकांना दारिद्रयातून बाहेर काढण्यासाठी किमान उत्पनाचा कायदा निर्माण केला जाणार आहे. असे सांगून चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना राज्यात जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा 10 हजार जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्यांना मंजूरी दिली. त्यामुळे एकही जनावर दगावले नाही. मात्र, सध्याचे मुख्यमंत्री चारा छावण्या उभारण्याचा निर्णय घेताना दहावेळा विचार करत आहेत. त्याचे परिणाम त्यांना आगामी निवडणुकीत दुष्काळी तालुक्‍यात प्रचार करताना भोगावे लागतील. तसेच जिल्ह्यात कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण स्वत: वेळ देणार आहे. प्रथम टप्प्यात नूतन पदाधिकाऱ्यांनी गावा-गावात जावून तयारीला सुरूवात करावी. त्यानंतर होणारा तालुका स्तरिय मेळावा नेत्रदिपक करूयात, असे देखील चव्हाण यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आ.जयकुमार गोरे म्हणाले,सातारा जिल्हा कॉंग्रेसने एकेकाळी राज्याला ताकद देण्याचे काम केले. मात्र, सन.1999 मध्ये जी लोक कॉंग्रेसच्या ताकदीवर मोठी झाली त्यांनी पक्षाशी प्रतारणा केली. तेव्हापासून कॉंग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता संघर्ष करतोय. मात्र, आता जिल्ह्यात पुन्हा एकदा कॉंग्रेस क्रमांक एकचा पक्ष झाला पाहिजे, या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. नूतन जिल्हाध्यक्ष रणजिसिंह ना.निंबाळकर यांना हिंदुरावभाऊ यांच्याकडून संघर्षाचा वारसा आपसुक आला आहे. त्यांच्यात सर्वांना सोबत घेवून जाण्याची क्षमता आहे.

रणजितसिंह ना.निंबाळकर म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानंतर जिल्हाध्यक्षपदाचे शिवधनुष्य उचलले आहे. इतर पदांपेक्षा जिल्हाध्यक्ष पद सांभाळणे कठीण बाब असली तरी सर्वांना सोबत घेवून जाण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्याकडून कोणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घेणार आहे. मात्र, आगामी काळात राजकीय दृष्ट्या कटू निर्णय घ्यावे लागतील.

जिल्हाध्यक्षपद ही केवळ शोभेची बाहुली न राहता कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले जाईल. प्रसंगी संघर्षाला देखील सामोरे जाण्याची तयारी असून त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ पाठीवर थाप द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ते म्हणाले, जिल्ह्यातील कोरेगाव, वाई, फलटण व कराड-उत्तर मतदारसंघात कॉंग्रेसला पोषक वातावरण आहे. त्या जागांवर मार्ग काढावा लागणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.

आनंदराव पाटील म्हणाले, पक्षाने युवकसह व ज्येष्ठ कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची 31 वर्ष दिलेली जबाबदारी पार पाडली. त्याचबरोबर कृष्णा खोरे विकास महामंडळाचा उपाध्यक्ष व उद्योग विभागाच्या संचालकपदाच्या कार्यातून पक्ष वाढविण्याचे काम केले. आता जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्यावर सोपविण्यात येत असून त्यांना सर्वोतपरी सहकार्य करणार असून येत्या काळात सातारा जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.

…मग बघू काय करायचे ते

दरम्यान, आ.जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचा नामोल्लेख टाळत जोरदार टीका केली.आगामी निवडणुकीत कॉंग्रेसला कोणी गृहित धरू नये असे सांगताना त्यांनी आघाडीच्या जागा वाटपानुसार उपेक्षित राहिलेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कायम तळीच उचलत रहायची का, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर जिल्ह्यात कॉंग्रेसच्या वाट्याला निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी केली. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र गोरेंच्या मागणीला बगल दिली. ते म्हणाले, अगोदर संघाचा विचार राज्यातून उकडून फेकू, मग बघू काय करायचे ते. असे सांगताना चव्हाण यांनी विधानसभेच्या निवडणूकीदरम्यानची आठवण सांगितली. त्यावेळी जागा वाटपाच्या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीने अचानक पत्रकार परिषद घेवून पाठिंबा काढण्याचे जाहीर केले व राष्ट्रपती राजवट लागू केली. तेव्हापासून आघाडी तुटली असून आता नव्या आघाडीत नव्या सुत्रानुसार जागा वाटप होण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.

आगलाव्यांपासून सावध रहावे लागेल

कॉंग्रेसमध्ये आता नाना अथवा गोरे अथवा इतर असे कोणतेही गटतट राहिलेले नाहीत. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकाला ताकद दिली पाहिजे. हे करत असताना मात्र, आग लावण्याचे काम जे लोक करित आहेत, त्यांच्यापासून आपल्याला सावध रहावे लागेल. असे सांगून आ.गोरे म्हणाले, येत्या काळात कॉंग्रेसच्या वैभवशाली इतिहासाप्रमाणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीची इमारत उभी राहिली पाहिजे. त्या ठीकाणी येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला कॉंग्रेस आपली आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. अशी इमारत आता सर्वांनी मिळून उभा करू या, असे आवाहन आ.गोरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)