संघव्यवस्थापनाने माझ्याशी कोणताही संवाद साधला नाही

कसोटी संघासाठी दुर्लक्षित करण्यात आलेल्या करुण नायरचा दावा

नवी दिल्ली – येत्या गुरुवारी सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या कसोटी संघावर अनेकांनी नाराजी प्रकट केली. वीरेंद्र सेहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणाऱ्या करुण नायरसह भारताला आशिया चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माचे नाव नसल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्‍का बसला.

-Ads-

त्यातच भारतीय संघाच्या मागील महिन्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील पाचही कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये अंतिम संघात मला स्थान का मिळाले नाही याविषयी संघव्यवस्थापनाने माझ्याशी कोणताही संवाद साधला नाही, अशी प्रतिक्रिया मधल्या फळीतील फलंदाज करुण नायरने दिली आहे. इंग्लंड दौऱ्यात एकही सामना न खेळलेल्या करुण नायरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आल्याने तो निराश झाला आहे.

करुण नायरच्या गाठीशी सहा आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या अनुभव असून, त्याने डिसेंबर 2016 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतकही झळकावले होते. वीरेंद्र सेहवाग वगळता त्रिशतक झळकावणारा करुण हा केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्यानंतर करुण नायरला केवळ तीन कसोटी सामन्यांत संधी मिळाली. मार्च 2017 नंतर तर तो एकही कसोटी सामना खेळलेला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी करुण नायरला बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीतही संधी मिळाली नव्हती.

त्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याला संघात स्थान मिळू शकले नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीसाठी त्याची संघात निवड केली होती. मात्र, अंतिम अकरात त्याला स्थान मिळाले नाही. यानंतर तो भारत ‘अ’ संघासोबत इंग्लंडला गेला. त्यात त्याने सहा प्रथमश्रेणी डावांत दोन अर्धशतके ठोकली. भारत-वेस्ट इंडीज कसोटी मालिकेपूर्वी विंडीज संघाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी करुण नायरने अध्यक्षीय संघाचे कर्णधारपद भूषवले. मात्र त्याला कसोटी संघात स्थान मिळाले नाही. त्यामुळे तो नाराज झाला आहे.

करुण नायरची इंग्लंड दौऱ्यासाठी सोळा जणांच्या कसोटी संघामध्ये निवड करण्यात आली होती. मात्र, अखेरच्या कसोटीत त्याच्याऐवजी नवोदित हनुमा विहारीला अंतिम संघात स्थान देण्यात आले. संघव्यवस्थापनाशी माझा कोणताही संवाद झाला नाही. हे स्वीकारणे माझ्यासाठी अवघड होते. पण, मी स्वत:हून संघव्यवस्थापनाला याविषयी विचारले नाही, असे करुण नायर म्हणाला. इंग्लंड दौऱ्यामध्ये मी बहुतांश वेळ ट्रेनर शंकर बासू आणि फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्यासोबत घालवला. संघामध्ये मी सर्वांत फिट असल्याचे बासू यांचे मत होते, असेही करुण नायरने सांगितले.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत माझ्या ऐवजी हनुमा विहारीला संधी मिळाली. माणूस म्हणून ही गोष्टी स्वीकारायला अवघड आहे. संघात कोणाला स्थान द्यायचे हा निर्णय संघव्यवस्थापनाचा आहे. आणि प्रत्येकाला तो स्वीकारणे भाग आहे. यात मी काहीही करू शकत नाही. मात्र, जेव्हा मला संधी मिळेल, त्या वेळी माझी बॅट प्रत्युत्तर देईल. या विषयावर मला आणखी काहीही म्हणायचे नाही असे करुण नायरने सांगितले.

नायरशी सविस्तर चर्चा केली – एमएसके प्रसाद

वेस्ट इंडीजविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड झाली आणि भारताचा कसोटी क्रिकेटमधला केवळ दुसरा त्रिशतकवीर करुण नायर पुन्हा एकदा संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला. करुणला संघातून वगळण्याच्या निवड समितीच्या निर्णयाबद्दल सोशल मीडियावर क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच संघव्यवस्थापनाने आपल्याशी कसलाही संवाद साधलेला नसल्याचे करुणने म्हटले होते.

परंतु संघ निवडीबद्दल आपण करुण नायरशी सविस्तर बोललो असून त्याची संघात निवड का करण्यात आली नाही याची कारणे त्याला सांगितलेली आहेत, असे निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. प्रसाद म्हणाले की, मी स्वतः करुण नायरशी बोललो होतो. यावेळी संघात पुनरागमनाबद्दल असणाऱ्या शक्‍यताही मी त्याला सांगितल्या आहेत. त्यामुळे एखाद्या खेळाडूला कोणत्या कारणासाठी संघातून वगळण्यात येते याबद्दल निवड समितीने आपली बाजू नेहमी सुस्पष्ट ठेवली आहे.

भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी करुण नायरची संघात निवड करण्यात आली होती. मात्र पाचपैकी एकाही कसोटी सामन्यात करुण नायरला अंतिम संघात स्थान मिळू शकले नाही. अखेरच्या कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने संघात बदल केले, त्यावेळीही नवोदित हनुमा विहारीला जागा देण्यात आली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघव्यवस्थापन करुण नायरच्या कसोटी संघातील समावेशाबद्दल खूष नव्हते.

काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत करुण नायरने आपल्याशी निवड समितीपैकी कोणीही संपर्क साधला नसल्याचे म्हटले होते. मात्र खेळाडूंशी अशा प्रकारं संपर्क साधला जात नाही, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले. करुण नायर देशांतर्गत क्रिकेट आणि भारत अ संघाकडून खेळत असताना चांगल्या धावा काढत राहिल्यास त्यालाही भारतीय संघात स्थान मिळू शकते असे एम. एस. के. प्रसाद यांनी सांगितले.

निवड समितील आपला सहकारी देवांग गांधी यांनी करुणशी याआधीच वैयक्‍तिक संवाद साधला असून इंग्लंड दौऱ्यात त्याचा अंतिम संघात समावेश का झाला नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे, असे सांगून प्रसाद म्हणाले की, करुणने निराशन होता रणजी करंडक, तसेच बाकीच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये भरपूर धावा कराव्यात. तसे केल्यास करुणची आज ना उद्या भारतीय संघात निवड होणारच, असा विश्‍वासही प्रसाद यांनी व्यक्‍त केला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)