संघव्यवस्थापनाकडून मालिकेतील कामगिरीचा अहवाल घेतला जाणार

नवी दिल्ली: भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यावरील कामगिरी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाला मायदेशातील लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 4-1 अशी बाजी मारली. या मालिकेतील निराशाजनक कामगिरीचे उत्तर भारतीय संघाला द्यावे लागणार असून संघातील खेळाडूंना आणि संघव्यवस्थापनाला कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दिले आहेत.

संघव्यवस्थापनाकडून मालिकेतील कामगिरीचा अहवाल मागवला जाईल. याबाबत मी कोणतेही आश्वासन देत नाही, परंतु संघाच्या कामगिरीचे परीक्षण केले जाईल. संघव्यवस्थापनाच्या अहवालानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे राय यांनी स्पष्ट केले. वेगवान गोलंदाज आणि विराट कोहली वगळले तर अन्य भारतीय खेळाडूंना या मालिकेत सपशेल अपयश आले आहे. यात संघव्यवस्थापनाची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावरील नाराजी अधिक वाढली आहे. प्रत्येक सामन्यातील अंतिम अकरा खेळाडू निवडण्याच्या त्यांच्या भूमिकेवर टीका होत आहे. त्यामुळे प्रशासकीय समितीने दिलेला इशाऱ्याचे गांभीर्य वाढले आहे.

इंग्लंडच्या दौऱ्यात भारताला वन-डे सामन्यांच्या मालिकेबरोबरच कसोटी मालिकेतही पराभव स्वीकारावा लागला. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, प्रशासकीय समितीची मुंबईत लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्य चर्चा न्या. लोढा समितीच्या शिफारशीनुसार बदल केलेली नवी घटना लागू करण्यावर होणार असली, तरी इंग्लंड दौऱ्यातील भारतीय संघाच्या कामगिरीवरही चर्चा होईल अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

यावेळी बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, रवी शास्त्री यांना वैयक्‍तिक भेटीसाठी पाचारण करायचे, की त्यांच्याकडून लेखी अहवाल मागवायचा, हा निर्णय प्रशासकीय समितीने घ्यायचा आहे. सध्या क्रिकेट सल्लागार समिती कार्यरत नसून बीसीसीआयची निवडणूक होईपर्यंत कार्यभार प्रशासकीय समितीकडे आहे. बैठक झाल्यास निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांचेही मत जाणून घेण्यात येईल.

बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, व्यवस्थापकाचा अहवाल हा औपचारिक असतो. सुनील सुब्रह्मण्यम यांची जबाबदारी पूर्णपणे प्रशासकीय आहे. त्यांच्याकडे निवास व्यवस्था, आवडीचे भोजन, प्रवास, सरावासाठी परिस्थिती याबाबतची जबाबदारी होती. सुबह्ममण्यम यांना कुठल्या अन्य बाबींवर निर्णय घेण्याचा अधिकार नाही. क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीबाबतचे उत्तर रवी शास्त्री, विराट कोहली किंवा निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याकडे मागितले जाईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)