संघर्ष आणि जिद्दीची यशोगाथा!

कुठेही गरीब वा गरजू दिसल्यास कोणताही विचार न करता त्याच्या मदतीला धावून जाणारे… कोणत्याही समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून जरी गेले तर समारंभ संपेपर्यंत थांबणारे आणि उरलेले अन्न घेऊन रस्त्यावरील गोरगरिबांचे पोट भरणारे… नवोदित तरुणांना मोलाचा सल्ला देणारा… शहरात कुठेही घाण किंवा समस्या दिसली की त्या समस्येचे निराकरण होईपर्यंत झटणारे…हे व्यक्‍तित्व म्हणजे पिंपरी-चिंचवडचे प्रख्यात उद्योजक विनोद बन्सल.

देहूरोडसारख्या एका लहानशा गावात त्यांचा जन्म 29 जुलै 1959 रोजी झाला. पाच भाऊ आणि एक बहीण अशा मोठ्या कुटुंबात राहून वेगवेगळ्या परिस्थितीशी संघर्ष करत विनोद बन्सल मोठे झाले. लहानपणापासूनच काही ध्येय उराशी बाळगून ते जिद्दीने उभारले. खेळ असो वा इतर कोणतीही स्पर्धा जिंकण्याची त्यांची जिद्द त्यांना इतरांपासून वेगळे सिद्ध करत होती.

आठवीत असताना त्यांनी पहिल्यांदा खेळामध्ये पदक मिळवले. तिथून सुरुवात झाली जिंकण्यासाठी संघर्ष करण्याची. शालेय व महाविद्यालयील जीवनात त्यांनी कित्येक मैदानी खेळांमध्ये हिस्सा घेतला आणि विजय मिळवला. कॉलेजमध्ये असताना विनोद बन्सल यांनी कबड्डी, बॉक्‍सिंग, टेबल टेनिस अशा कित्येक खेळांमध्ये विजेतेपद पटकावले आहे. 1980 साली विज्ञान शाखेतून स्नातकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सहज कुठेही मिळू शकणाऱ्या नोकरीला नाकारत त्यांनी व्यवसायाची कास धरली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यावेळी ते बरेच सदस्य असलेल्या एका संयुक्‍त कुटुंबात राहात होते. त्यांचे चुलतभाऊ आपला व्यवसाय बंद करून गावी परतणार होते, ते किराणा दुकान बंद न करता त्यांनी चालवण्यासाठी घेतले. उंच भरारी घेण्याच्या त्यांच्या मानसिकतेमुळे त्यांचे मन त्या लहानशा दुकानात रमत नव्हते. त्यांच्या एका भावाने दिल्लीमध्ये स्टीलची फॅक्‍टरी टाकली होती. 1982 साली ते दिल्लीला आपल्या भावासोबत उद्योग करण्यासाठी गेले. तीन वर्षांनी वडिलांनी त्यांना परत बोलवून घेतले आणि येथूनच सुरू झाली त्यांच्या उद्योग आणि व्यवसायाची संघर्षाने भरलेली यशोयात्रा…

1983 मध्ये त्यांनी उधार-उसने, बॅंकेचे कर्ज घेऊन टाईल्सची फॅक्‍टरी पिंपरी-चिंचवड शहरात सुरू केली. आज कोहिनूर टाईल्स हा त्यांचा व्यवसाय केवळ शहरातच नव्हे तर आसपासच्या परिसरात खूपच प्रसिद्ध आहे. 1988 साली रियल इस्टेट क्षेत्रात उतरले. त्यानंतर सध्या राज्यसभा खासदार असलेले बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी सन 2001च्या सुमारास आपल्या इमारतीच्या विक्रीची जबाबदारी विनोद बन्सल यांच्यावर सोपवली आणि त्यांनी ती समर्थपणे पेलली. यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला. 2002 साली त्यांनी बांधकाम क्षेत्रातील बन्सल ग्रुपची स्थापना केली.

शिक्षण आणि व्यवसाय
विनोद बन्सल सांगतात, एका लहानशा किराणा दुकानावर सहा भावंडे आणि इतर सदस्य यांचे पालनपोषण वडील करत होते. एका लहानशा गावात, लहानशा घरात राहात असताना, कोणत्याही आवश्‍यक सुविधा नसतानादेखील सर्वांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांचे बंधू डॉ. श्रीनाथ बन्सल यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मेरीट लिस्टमध्ये स्थान मिळवले होते. घरात सर्वच भावंडे उच्चशिक्षित आहेत. तीन भाऊ डॉक्‍टर असताना विनोद बन्सल यांनी मात्र उद्योग-व्यवसायाशी नाते जोडले आणि आपल्या भावंडांनाही सोबत घेतले. बन्सल सांगतात की, त्यांच्या वडिलांनी त्यांना संयुक्‍त कुटुंबाचे जे बाळकडू पाजले ते आजही तसेच आहे. आजही प्रत्येक सण सहाही भावंडे एकत्रितपणेच साजरा करतात.

संघटन कौशल्य व नेतृत्वगुण
विनोद बन्सल यांच्यात लोकांना जोडणारे संघटन कौशल्य आणि नेतृत्वगुण पहिल्यापासून आहेत. कॉलेजच्या काळात याच गुणांवर त्यांनी विद्यार्थी राजनीतीतही आपली चुणूक दाखवली होती. महाविद्यालयीन निवडणुकादेखील त्यांनी जिंकल्या होत्या. त्यांच्या या गुणाचा त्यांना उद्योग व्यवसायासोबत सामाजिक कार्यातदेखील खूप उपयोग झाला. “लॅंडमार्क’शी संलग्न होऊन त्यांनी आपल्या या गुणांना अजून चमकवले. आत्मविकास व सामाजिक कार्यात पुढाकार घेण्यासाठी लॅंडमार्क फोरमचा कोर्स खुपच उपयोगी सिद्ध होतो. सर्वांनी याचा नक्की अनुभव घ्यावा असेही ते आवर्जून सांगतात. लॅंडमार्कमुळेच त्यांना “स्वच्छ पीसीएमसी सुंदर पीसीएमसी’ या ग्रुपची संकल्पना राबवता आली. तसेच त्यांची मुलगी डॉ. प्रियंका बन्सलसोबत “खाना बचाओ, खाना खिलाओ’ या संस्थेच्या माध्यमातून गरजूंना अन्न वाटप करण्याची प्रेरणा मिळाली.

सामाजिक कार्य
सुरुवातीपासून सामाजिक कार्यामध्ये पुढाकार घेणारे विनोद बन्सल यांनी गोरगरिबांसाठी कित्येक उपक्रम राबवले आहेत आणि अजूनही त्यांचे कार्य सातत्याने सुरू आहे. 1986 पासून अग्रवाल समाज पिंपरी-चिंचवडच्या माध्यमातून त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली. या संघटनेचे सरचिटणीस पद भूषविल्यानंतर 2008 साली त्यांना समाजाने अग्रवाल समाज पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी अग्रसेन भवनाची पायाभरणी केली. तसेच कित्येक दिवसांपासून प्रलंबित आणि केवळ चर्चेत असलेला गोरगरिबांना निःशुल्क उपचार देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी अंमलात आणला. गरिबांना मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार मिळावेत, यासाठी विनोद बन्सल यांचे बंधू डॉ. रमेश बन्सल प्रयत्न करत होते. या संकल्पनेला मूर्तस्वरूप प्रदान करत विनोद बन्सल यांनी चिंचवड येथे अग्रवाल समाजाच्या इमारतीत दवाखाना सुरू केला. गेल्या एका दशकापासून परिसरातील कित्येक गरजू रुग्णांसाठी हा दवाखाना वरदान सिद्ध होत आहे. आजही रोज येथे सुमारे 80 ते 100 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. यामुळे येथे एक मेडिकल टीम तयार झाली. आज समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात डॉक्‍टरांच्या या टीमचे मोठे योगदान असते. सध्या ते अग्रवाल फेडरेशन पुणे या अग्रवाल समाजाच्या शिखर संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. अग्रवाल फेडरेशन ही संघटना पुणे जिल्ह्यातील 54 अग्रवाल समाजाच्या विविध संघटनांची शिखर संस्था मानली जाते. उद्योगांच्या समस्या सोडवण्यासाठीदेखील त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. विनोद बन्सल हे पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिसेस ऍण्ड ऍग्रिकल्चर या संघटनेचे ते कार्यकारिणी सदस्य आहेत. तसेच उद्योगनगरीतील औद्योगिक संघटनांची शिखर संस्था मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड एमएसएमई इंडस्ट्रीज असोसिएशन फोरमचे ते खजिनदारही आहेत.

शिस्त हाच मंत्र
उद्योग आणि सामाजिक कार्य या दोन्ही बाबतीच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारे विनोद बन्सल हे यशाचा मंत्र “शिस्त’ हाच असल्याचे सांगतात. वक्‍तशीरपणा आणि सर्व नियम-कायदे पाळल्यास यश हुलकावणी देऊ शकत नाही, असे त्यांचे सष्ट मत आहे. ते म्हणतात, वेळ आणि शब्द या दोन बाबी एकदा दिल्या की कोणत्याही परिस्थितीत पाळण्याचा प्रयत्न करावा. तसेच वेळ आणि शब्दासोबत नियम हेदेखील पाळलेच गेले पाहिजेत. मग ते वाहतुकीचे नियम असले तरी. कारण नियम हे पोलीस किंवा सरकारला दाखवण्यासाठी नसतात तर नागरिकांच्या हितासाठी असतात. यशस्वी व्हायचे असले तर सर्वांत प्रथम अशा प्रकारची “शिस्त’ अंगी बाणवलीच पाहिजे.

कुटुंब आणि आप्तेष्ट
इतर यशस्वी लोकांपेक्षा थोडेसे वेगळे विचार असणारे विनोद बन्सल सांगतात, “तुम्ही ध्येयासाठी कितीही संघर्ष करा; परंतु हे करत असताना तुमचे कुटुंबीय आणि आप्तेष्ट यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपल्या यशाचे श्रेय ते आपल्या आई-वडील आणि भावंडांप्रमाणे आपली पत्नी उषा यांनादेखील देतात. त्यांची तीनही मुले उच्चशिक्षित असून सर्वांना मास्टर डिग्री परदेशातील नामांकित विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केली आहे. त्यांची मुलगी डॉ. प्रियंका बन्सल या एमडीएस आहेत आणि सध्या पीएच.डी. करत आहेत. जावई डॉ. अजय प्रकाश अग्रवाल हेदेखील रेडियोलॉजिस्ट असून लोणावळा येथे त्यांचे रुग्णालय आहे. विनोद बन्सल यांचे पुत्र सुमित बन्सल यांनी पुण्यात सिव्हिल इंजिनिअरिंग केले आणि पुढील शिक्षण विदेशात घेतले तसेच अमित बन्सल यांनीदेखील कॅनडा येथून एमबीए केले आहे. सुमित हे सध्या बांधकाम व्यवसायातील एक प्रतिष्ठित नाव असून अमित बन्सल यांची ग्रीन नेटची फॅक्‍टरी आहे. अमित बन्सल हे देखील राष्ट्रीय पातळीवर उच्च प्रतीचे उत्पादन करण्यासाठी प्रख्यात आहेत. विनोद बन्सल यांच्या दोन्ही सुना सोनल बन्सल आणि भूमी बन्सल यादेखील उच्चशिक्षित असून प्रत्येक बाबतीत मोलाचे सहकार्य करत असतात, असे बन्सल अभिमानाने सांगतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)