संघर्ष अधिक … सन्मान कमी…!

6 जानेवारी 2019 हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या निमित्याने पत्रकारांचा सन्मान व त्यांच्या कर्तृत्वाचा एक आढावा घेतला जातो पण, पत्रकारांचे वास्तव्य जीवनाकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. ज्या सत्य घटना समाजापुढे मांडताना अनेकदा माफियाराजकडून त्यांच्यावर जीव घेणे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यामध्ये अनेक पत्रकारांना आपले जीव गमवावा लागला आहे. लोकशाही प्रणालीमधील ठोकशाहीप्रणालीचा झालेला शिरकाव आजच्या काळात पत्रकारासाठी अडचणीचे ठरत आहे. याविषयी श्रीरंग काटेकर लेख ……

पत्रकारांच्या जीवनामध्ये संघर्ष अधिक व सन्मान कमी अशी अवस्था भारतीय लोकशाहीमध्ये झाली आहे. खरेतर पत्रकार घटक हा लोकशाही प्रणालीतील चौथा घटक मानला जातो. परंतू या घटकाकडे ना शासनाचे लक्ष ना समाजाचे पाठबळ अशा विचित्र परिस्थितीत आजच्या पत्रकारांची खडतर वाटचाल सुरु आहे. लोकशाहीमध्ये पत्रकारांच्या जीवावर होणारे वाढते हल्ले हा चिंतेचा विषय बनला आहे. परखड व निर्भयपणे लेखन करणारे पत्रकारांची हत्या केली जात आहे. हे विदारक चित्र पाहाता 21 व्या शतकातील पत्रकारीता सक्षमपणे उभी राहील का याबाबत आता शंका उत्पन होवू लागली आहे. वास्तविक भारतीय लोकशाही प्रणालीमध्ये निर्भीडपणे विचार मांडणारे पत्रकार बंधूवर आजच्या काळात विधायक शक्तीकडून मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत.

विधायक शक्तीची दडपशाही दिवसेंदिवस वाढत असल्याने पत्रकारांचे जीवन असुरक्षित बनले आहे. जनहिताच्या न्याय हक्कासाठी झगडणारा पत्रकार बंधूची आजच्या काळात मुस्कटदाबी होत आहे. जनहितासाठी आपल्या लेखणीतून समाज जीवनाला दिशा देणारे पत्रकारांच्या व्यथा व वेदना मात्र वेगळयाच आहेत. तुटपुंजा पगार, असुरक्षित नोकरी या सर्वावर मात करीत पत्रकार आपली भुमिका मात्र चोख बजावित आहे.

अत्यंत प्रतिकुलतेशी सामना करणार हा घटक खऱ्या अर्थाने परखडपणे शब्दरचना करुन तो समाजापुढे मांडत असतो. वेळ काळ याचे भान विसरुन सातत्याने समाज सक्षमतेचा ध्यास घेऊन वाटचाल करणारा हा घटक समाज परिवर्तनाच्या घडामोडातील एक महत्वपूर्ण दुवा म्हणून ओळखला जातो. परंतु पत्रकाराच्या जीवनाचे खरे वास्तव अत्यंत भयानक आहे. परंतू त्यावरही तो मात करत आपले कर्तव्य तो प्रमाणिकपणे निभवत आहे.

आजच्या काळात सामाजिक परिवर्तनांच्या लढाईचा वसा घेवून वेगवेगळया क्षेत्रातील घडणाऱ्या घडामोडी निर्भयपणे समाजापुढे मांडताना येणाऱ्या अनंत अडचणीवर तो मात करत असतो. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात स्वच्छ व पारदर्शकतासाठी झटण्याची वृत्ती ठेवून असंख्य पत्रकार बंधूनी वृत्तपत्र सृष्टी नावारुपास आणली. न्यायाला साथ, अन्यायावर मात यासाठी लेखणी’ चालवली. परंतू समाज विघातक शक्तीकडून अनेक वेळा पत्रकारावर प्राणघातक हल्ले करण्यात आले.

बेंगलोरमधील जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची झालेली हत्या भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने मारक ठरली आहे. पत्रकारावर आजपर्यंत झालेल्या हल्यात सिरसामध्ये पत्रकार रामचंद्र छत्रपती, प्रसिध्द क्राईम रिपोर्टर ज्योतिमय डे, मीडिया राजचे राजेश मिश्रा, नेटवर्क 18 चे राजेश वर्मा, आंध्रप्रदेशचे वरिष्ठ पत्रकार एम. व्ही. एन शंकर, ओडिसातील स्थानिक टी. व्ही. चॅनेलचे पत्रकार तरुणकुमार, हिंदी दैनिक देशबंधुचे पत्रकार साई रेड्डी, आज तकचे विशेष पत्रकार अक्षय सिंह, मध्यप्रदेशचे पत्रकार संदीप कोठारी, उत्तरप्रदेशचे पत्रकार जगेंद्र सिंह, हिंदी दैनिक हिंदुस्तानचे पत्रकार राजदेव रंजन, साताराचे नरेंद्र दाभोळकर यानी आपले प्राण गमवलेले आहेत. वास्तविक लोकशाहीतील पत्रकार हा प्रमुख घटक असताना त्याकडे गार्भियाने पाहणे गरजेचे आहे.

-श्रीरंग काटेकर, सातारा.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage: