फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल अंकिताचा गौरव 

पुणे – मी आज फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. परंतु हे यश मला खडतर संघर्ष केल्यानंतरच मिळाले आहे, असे भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू पुण्याची अंकिता रैना हिने यावेळी सांगितले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल लक्ष्य, पीएमटीडीए व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्यातर्फे अंकिता रैनाचा गौरव करण्यात आला. यावेळी ती बोलत होती. पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, सुंदर अय्यर, ग्रॅंडमास्टर अभिजीत कुंटे, पीवायसीचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, अंकिताची आई ललिता रैना आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

आपल्या संघर्षाच्या काळात मदत करणाऱ्या सर्वांना अंकिताने धन्यवाद दिले. तसेच, त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत मजल मारू शकले, असे तिने नमूद केले. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी डब्लूटीए स्पर्धा, तसेच चीनमधील स्पर्धा खेळून सराव केल्याचे तिने सांगितले. तसेच, आपला आवडता सरफेस ग्रासकोर्ट असल्याचे सांगून अंकिता म्हणाली की, क्‍ले कोर्टवर होणाऱ्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी मी वेगळा सराव केला. तसेच, आगामी विम्बल्डन टेनिस स्पर्धेतही मी सहभागी होणार आहे.

युरोप किंवा अमेरिकेतील अधिक तंदुरुस्त आणि बळकट शरीरयष्टी असलेल्या खेळाडूंशी तोंड देण्यासाठी प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव केला आहे. अशा खेळाडूंचा सामना करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्‌या सज्ज असणे आवश्‍यक असते. परंतु मी आता बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळत असल्यामुळे अशा खेळाडूंना तोंड देण्याचा मला पुरेसा अनुभव आहे, असे सांगून अंकिता म्हणाली की, पीवायसी आणि लक्ष्य यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला इथपर्यंत वाटचाल करता आली. पीवायसी हिंदू जिमखाना, लक्ष्य, प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि सुंदर अय्यर यांचे मला वेळोवेळी बहुमोल साहाय्य लाभले आहे.

पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणाले की, अंकिता फ्रेंच ओपनसाठी पात्र ठरल्यामुळे युवा खेळाडूंना अधिक प्रेरणा मिळेल. यामुळे एक सर्वसाधारण घरातील मुलगी ही ग्रॅंड स्लॅमपर्यंत मजल मारू शकते, हा आत्मविश्वास उदयोन्मुख खेळाडूंच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. लक्ष्यचे अभिजीत कुंटे म्हणाले की, अपयशी ठरत असतानाही अंकिताने धीर आणि संय्यम न सोडता सातत्याने प्रयत्न करणे सुरू ठेवले. या गुणांचा आदर्श सर्व खेळाडूंनी ठेवला पाहिजे.

अंकिताने बालपणापासून केलेली मेहनत आणि तिच्या आईने केलेला त्याग याची माहिती सुंदर अय्यर यांनी दिली. सोळा वर्षाची असताना तिने 18 वर्षांखालील राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आणि आता पुण्यात सराव करून ग्रॅंड स्लॅमपर्यंत पोहचणारी ती पहिली पुणेकर खेळाडू ठरली आहे. तिच्यातील गुणवत्ता पाहून तिला लक्ष्यने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आणि आपल्या कामगिरीने तो तिने सार्थ ठरविला आहे, असे सांगून सुंदर अय्यर म्हणाले की, आम्हांला अंकितासाठी अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी कंपन्यांतील भारतीयांनीदेखील आर्थिक मदत केली आहे. तसेच, शासनाने देखील तिला टॉप योजनेअंतर्गत मदत करण्याचे मान्य केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)