संघर्षाचा काळ हा सर्वात आनंददायी असतो – डॉ. सलिल कुलकर्णी

पुणे  – संघर्षाचा काळ हा सर्वात आनंददायी काळ असतो. तेव्हा कौतुकाची थाप मिळत असते. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले की, खऱ्या अर्थाने संघर्षचा काळ सुरु होतो. कौतुकाची थाप वेगळ्या कारणात बदलत जाते. कारण जेवढे तुम्ही प्रसिद्ध होत जाता तेवढे तुमचे टीकाकार वाढत जातात. उभी लिहीली की कविता आणि आडले लिहीले की लेख होतो असे काही नसते. त्यामध्ये अर्थ पाहिजे असे मत संगीतकार डॉ. सलिल कुलकर्णी यांनी मंगळवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित “सांस्कृतिक कट्टा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सरचिटणीस दिगंबर दराडे उपस्थित होते.
संगीतक्षेत्रीतील बदलांविषयी बोलता डॉ. कुलकर्णी म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये संगीतकार होण्यासाठी तंत्रज्ञान आवश्‍यक असल तरी सध्याचे तरूण संगीतकार संगीत निर्मितीसाठी हार्मोनियम ऐवजी मशीन, लॅपटॉप च्या माध्यमातून स्वतः गाणी लिहीतात, अशांना आपण गीतकार आणि संगीतकार म्हणतो. सध्याच्या पिढीत संगीतकाराऐवजी तंत्रज्ञ तयार होत असल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली.
सोशल मिडीयामुळे बदल घडले आहेत. त्यामुळे पालकांनी सजग राहिले पाहिजे. पालकत्व हे बर्डन म्हणून नाही तर संधी म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. मुलांची हार्डडिस्क ही कोरी असते त्यामध्ये कचरा भरण्याचे काम आपण करीत असतो, असेही त्यांनी सांगितले.
सगळ्यात जास्त सूर बा.भ. बोरकर यांच्याशी जुळले. त्यांच्या कविता मी जास्तीत जास्त सादर करीत असतो. तर इंदिरा संत या कवियित्री माझ्याकडून राहून गेल्या आहेत. विं.दा. करंदीकर हे कम्युनिस्ट होते. त्यांच्या कवितांमधून ते जाणवते.
गर्दीच्या संवेदना बहुतेकदा भडक असतात. त्या तार्किक राहत नाहीत. मनामनातील जातीच्या भिंती दिवसेंदिवस भक्कम होत चालल्या आहते. आपण पुढे वाटचाल करण्याऐवजी आणखी मागे चालले आहोत. गेल्या वीस-पंचवीस वर्षामध्ये समाजातील समस्या, अडचणी जैसे थे आहेत. सध्या समाजात साचलेपण नव्हे, तर मागासलेपण पहायला मिळते. पुढील पिढीवर यातून काय संस्कार होणार आहेत, याची संवेदनशील माणूस म्हणून काळजी वाटते, तसेच संपूर्ण ग्रेस या अल्बमवर काम सुरु असून, लवकरच संपूर्ण ग्रेस हा अल्बम प्रदर्शित होईल, असेही त्यांनी नमूद केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)