“संग्रामदुर्ग’ महिनाभरात उत्खनन

राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक वहाणे : किल्ला संवर्धनाचा प्रकल्प घेतला हाती

चाकण- पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली चाकणच्या ऐतिहासिक संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या उत्खननास पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. चाकणच्या भुईकोट किल्ल्यावर होणाऱ्या उत्खननानंतर मूळ स्वरुपातील किल्ला समोर येणार आहे. पूर्वी सारखाच किल्ला दिसावा यासाठी शासनाने किल्ला संवर्धन प्रकल्प हाती घेतला असल्यामुळे किल्ला संवर्धनाचे काम सुरू होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निधीची तरतूद केली असून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील एक महिन्यात किल्ल्याच्या परिसरात उत्खनन सुरू होणार असल्याचे राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे यांनी सांगितले.
चाकणच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे सुमारे 200 वर्षे जुने नकाशे उपलब्ध झाल्यानंतर या नकाशाच्या आधारे मूळ स्वरुपात किल्ला अस्तित्वात आणण्यासाठी उत्खनन करण्याचे पुरातत्व विभागाचे प्रयत्न आहेत. उपलब्ध झालेल्या त्या पुरातन नकाशाच्या आधारे किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी किल्ल्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, या मागणीसाठी खेडचे लोकप्रतिनिधी व किल्लेदार फिरंगोजी नरसाळा स्मारक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना साकडे घातले होते. आमदार सुरेश गोरे यांनी जिल्हाधिकार्यांना याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने उत्खननासाठी विशेष बाब म्हणून 5 लाख रुपये देण्याचे मान्य केले आहे. चाकणच्या किल्ल्यावर काही भागात सूक्ष्म उत्खनन करून या भागात पूर्वी काय होते, किल्ल्याची नेमकी हद्द कोणती, किल्ल्याच्या मूळ वस्तूवर नेमका किती मलबा साचला आहे त्याचप्रमाणे ऐतिहासिक वस्तू मिळतात का? याचा शोध घेण्यात येणार आहे.

  • शिवकालीन वस्तू-ठेवा समोर येणार !
    चाकणच्या किल्ल्यात मागील 25 ते 50 वर्षांत विविध वस्तू सापडल्याच्या अनेक कथा-आख्यायिका सांगण्यात येतात. मात्र, पुरातत्व विभागाच्या सूक्ष्म उत्खननात तोफेचे गोळे, बंदुकीची काडतुसे, जुने खिळे, नाणी असा ऐतिहासिक ठेवा सुद्धा समोर येण्याची शक्‍यता आहे. या उत्खननात ऐतिहासिक दुर्मिळ ठेवा, शिवकालीन वस्तू उत्खननात सापडतील अशी आशा शिवप्रेमी व चाकण परिसरातील नागरिकांना आहे.
  • किल्ल्याचा आराखडा तयार करण्यासाठी किल्ल्यामध्ये नकाशाच्या आधारे उत्खनन करण्यात येणार आहे. जुन्या काळातील पुरातन वास्तू नकाशे, मोजमाप नकाशे तसेच किल्ल्याचा आराखडा उपलब्ध झालेला आहे. समोर आलेले संग्रामदुर्ग किल्ल्याचे नकाशे 1818 मधील इंग्रज राजवटीतील असल्याचे स्पष्ट होत आहे. तब्बल 200 वर्षे जुन्या असलेल्या या नकाशांमुळे मूळ स्वरूपातील किल्ला समोर येणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर उत्खनन सुरू करण्यात येणार असून महिनाभरात ते पूर्ण होईल.
    – विलास वहाणे, सहायक संचालक, पुरातत्व विभाग, महाराष्ट्र

-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)