संगमनेर : एमएच. 17 परवानाधारक वाहनांना पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर टोलमुक्ती मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने सोमवारी आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी शिवसैनिकांनी टोलनाक्याच्या कॅबीनची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांच्यासह 20 शिवसैनिकांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिवरगावपावसा टोलनाका प्रशासनाकडून वाहनधारकांना दमबाजी केली जात असे, स्थानिकांना करामध्ये सवलत दिली जात नाही, शेतकर्यांची वाहने अडवून त्यांच्याकडून कर वसूल केला जातो. टोलनाका प्रशासनाच्या हुकूमशाहीला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे, अशा अनेक तक्रारी शेतकर्यांच्या शिवसेनेकडे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर स्थानिकांना टोलमुक्ती द्या, अन्यथा टोलनाका कायमचा बंद करु, असा इशाराच शिवसेनेच्यावतीने देण्यात आला होता. मात्र टोलनाका प्रशासनाने दखल घेतली नसल्याने सोमवारी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, संजय फड, अशोक सातपुते, दिलीप साळगट यांच्यासह शिवसैनिकांनी हिवरगाव पावसा टोलनाक्यावर मोर्चा नेत तीव्र आंदोलन केले.
यावेळी संतप्त शिवसैनिकांनी टोलनाका बुथ क्रमांक 2 च्या काचा फोडल्या. दरम्यान टोलनाका व्यवस्थापक संजय तुकाराम लोणे यांनी याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर (घारगाव), उपतालुका प्रमुख गुलाब भोसले (बिरेवाडी), भीमाशंकर पावसे (हिवरगावपावसा), भाऊसाहेब हासे (संगमनेर) व संदीप रामचंद्र गुंजाळ (खांडगाव) यांच्यासह इतर 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एम. बी. खान करीत आहेत.
संगमनेर तालुक्यातील शेतकर्यांचा शेतीमाल घेऊन येणार्या वाहनांना संपूर्ण टोलमाफ व्हावा ही आमची मागणी आहे. तालुक्यातील शेतकर्यांना टोल पावतीच्या 50 टक्के टोल आकारला जातो आहे. शेतकर्यांचा हा टोल देखील माफ झाला पाहिजे. तालुक्यातील शेतकर्यांच्या वाहनांना पूर्णतः टोलमाफी झाली पाहिजे. शेतकरी व सर्वसामान्य जनसेसाठी आमचा लढा आहे. येत्या 29 एप्रिलला होणार्या बैठकीत टोलमाफीचा निर्णय अपेक्षित आहे. तसे न झाल्यास या पेक्षाही मोठे आंदोलन उभारण्यात येईल, त्यासाठी कितीही गुन्हे अंगावर घेण्याची आमची तयारी आहे. मात्र शेतकर्यांसाठी केलेल्या आंदोलनात माझ्यासह शिवसैनिकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे आहे. – जनार्दन आहेर, शिवसेना तालुका प्रमुख, संगमनेर
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा