संगमनेर शहरातील 76 रुग्णालये रडारवर

संगमनेर : निवासी प्रयोजनातील क्षेत्र, कागदपत्रांची अपूर्तता, बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टचे उल्लंघन अशा विविध कारणांनी संगमनेरातील साईनाथ रुग्णालयाची मान्यता रद्द होण्याच्या कारवाईला आठवडा उलटायच्या आतच शहरातील अन्य 76 रुग्णालये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या ‘रडार’वर आली आहेत.

याबाबतच लवकरच चौकशी समितीकडून या रुग्णालयांची तपासणी होणार असल्याने शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात ‘भूकंप’ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या 22 मार्च रोजी जाणता राजा मैदानाकडे जाणार्‍या रस्त्यावरील डॉ. अमोल कर्पे यांच्या 25 बेडच्या साईनाथ रुग्णालयाची मान्यता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे यांनी रद्द केली होती. यासाठी त्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने डॉ. कर्पे यांच्या रुग्णालयाचे बांधकाम बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टचे उल्लंघन करणारे ठरविले होते.

त्यातच हे रुग्णालय निवासी प्रयोजनाच्या क्षेत्रात उभारल्याने त्याची मान्यता रद्द करण्याची शिफारस समितीने केली होती. त्यावर निर्णय घेत डॉ. गाडे यांनी सदर रुग्णालयाची मान्यता रद्द केली. या कारवाईने संगमनेरातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. ही कारवाई होऊन आठवडा उलटायच्या आतच डॉ. कर्पे यांच्या रुग्णालयाप्रमाणेच बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्टचे उल्लंघन, बांधकाम परवानगी नाही, निवासी प्रयोजनाचे क्षेत्र, अनियमितता, कागदपत्रांची अपूर्तता, प्रत्यक्षात ‘क्लिनिक’ची परवानगी असताना थाटलेली रुग्णालये, सादर नकाशाप्रमाणे बांधकाम नाही, रुग्णालयाची शिफारस नाही, अशा विविध गोष्टींची अपूर्तता असलेल्या व नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या शहराच्या विविध भागांतील अन्य 76 रुग्णालयांविरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार दाखल झाली आहे.

तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या या रुग्णालयांमध्ये संगमनेरातील अनेक ‘बड्या’ रुग्णालयांचा व डॉक्टरांचा समावेश आहे. यासोबतच पूर्वग्रह ठेवून काहींना ‘त्रास’ देण्याच्या हेतूनेही काही नावे या यादीत जोडण्यात आल्याची चर्चा आहेत. याबाबतची तक्रार शहरातील एका नामांकित व्यक्तिने गेल्या शुक्रवारी (ता. 23) दाखल केली होती. त्यानुसार लवकरच जिल्हा शल्य चिकित्सकांकडून चौकशी समिती स्थापन करून या तक्रार अर्जाची सत्यता पडताळली जाणार आहे. त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा निश्‍चित होईल, अशी माहिती हाती लागली आहे.डॉ. कर्पेंच्या साईनाथ रुग्णालया पाठोपाठ आता नावाजलेल्या वैद्यराजांसह शहरातील शहात्तर रुग्णालये एका तक्रारअर्जाने जिल्हा शल्य चिकित्सकांच्या रडारवर आली आहे. या प्रकरणातून येणार्‍या काळात संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठा ‘भूकंप’ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)