संगमनेर : मार्केटयार्ड परिसरातील तीन दुकानात चोरी

संगमनेर – संगमनेर तालुक्यात घडणार्‍या चोर्‍यांचे लोण आता संगमनेरात येऊन पोहोचले आहे. बुधवारी मध्यरात्री मार्केटयार्ड परिसरातील तीन दुकाने एकाचवेळी फोडून चोरट्यांनी 1 लाख 62 हजारांची रोकड लांबविली. यातील एका दुकानात सीसीटीव्ही असल्याने तिघे चोरटे त्यात कैद झाले आहेत. मात्र त्यांनी तोंडावर रुमाल बांधल्याने त्यांची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.आज सकाळी ही चोरीची घटना उघड झाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्यरात्रीनंतर 12.45 ते1वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली. शहरातील पुणे-नाशिक महामार्गावर मार्केटयार्ड परिसरातील व्यावसायीक गाळ्यांमध्ये दुसर्‍या मजल्यावरुन तिनही गाळ्यांचे शटर उचकटून चोरट्यांनी आपला डाव साधला. या गाळ्यांमधील नितीन गुजर यांच्या सत्यप्रभा मेटल स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी  70  हजार रुपयांची रोकड लंपास केली.

येथील कार्यभाग उरकल्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा राजेंद्र रहाणे यांच्या किसान हार्डवेअरकडे वळविला. याही दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्ल्यात ठेवलेली 52 हजारांची रोकड लांबविली. त्यानंतर वीज मंडळाचे कॉन्ट्रॅक्टर रवी ढेरंगे यांच्या साईकृपा इलेक्ट्रिकल्स या दुकानातही चोरट्यांनी अशाच पद्धतीने शटर उचकटून प्रवेश केला. मात्र यावेळी तिनही चोरटे तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोकुळ औताडे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिनही दुकानांची पाहणी करुन तपासी अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या प्रकरणी नितीन प्रभाकर गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)