संगमनेर, पारनेर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या

संगमनेर: निळवंडेपाठोपाठ आता पिंपळगाव खांड धरणाचे पाणी पेटले आहे. धरणातून पिण्यासाठी सोडण्यात आलेले पाणी आभाळवाडी बंधाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर वरच्या भागात बंधाऱ्यातील ढापे टाकण्यात आले. त्यामुळे या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने हे पाणी शेवटपर्यंत जाणार नसल्याचे स्पष्ट होताच, संतप्त संगमनेर आणि पारनेर तालुक्‍यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी ठिय्या आंदोलन केले.

पिंपळगाव खांड धरणातून 17 डिसेंबरला पाणी सोडण्यात आले होते. या पाण्यासंदर्भात अकोलेचे आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये प्रांताधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बैठकीत हे पाणी शिंदोडीपर्यंत विना अडथळा सोडण्याचा निर्णय झाला होता. शिंदोडीपर्यंत पाणी गेल्यास ते संगमनेर व पारनेरच्या मुळा नदीकाठच्या काही भागातील शेतकऱ्यांना मिळण्याची आशा होती. त्यामुळे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार होता. यंदा पाऊस कमी झाल्याने मुळा नदी काठच्या पाणीपुरवठा योजना ठप्प पडल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र धरणातून सोडण्यात आलेले पाणी, मंगळवारी आभाळवाडी बंधाऱ्यात पोहोचल्यानंतर धरणाच्या लाभक्षेत्रातील वरील भागात लगेचच शेतकऱ्यांनी बंधाऱ्यामध्ये ढापे टाकून या पाण्याचा प्रवाह कमी केला. त्यामुळे ते पाणी आता पुढे जाऊ शकणार नसल्याने ज्या भागाला पाणी मिळू शकणार नाही अशा जांबूत, साकुर, शिंदोडी, नांदूर, बिरेवाडी, मांडवे खु, देसवडे, टेकडवाडी या मुळा नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, संजीव भोर यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयात ठिय्या दिला. त्यावेळी प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, उपअधीक्षक अशोक थोरात यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली मात्र या बैठकीकडे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी मध्यस्थी करीत कारखान्याच्या काही कर्मचाऱ्यांसह पोलिसांची मदत घेत नदीपात्रातील ढापे काढण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने हे पाणी शिंदोडीपर्यंत पोहचु शकले नाही, मात्र आज शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख हे जलसंपदा अधिकारी, पोलीस फाटा, कारखान्याचे कर्मचारी यांच्या मदतीने नदीपात्रात संगमनेर-अकोले तालुक्‍यातील बंधाऱ्यांमधील चारपेक्षा जास्त ढापे काढून घेतले.

रात्री उशीरापर्यंत हे ढापे काढण्याचे काम सुरू होते. मात्र शेतकरी कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी भेटण्यासाठी अडून बसल्याने रात्री उशीरापर्यंत प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर भाऊसाहेब थोरात कारखाण्याचे संचालक इंद्रजीत थोरात, बाजार समीतीचे सभापती शंकरराव खेमनार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा ठिय्या रात्री उशीरापर्यंत सुरू होता. यामुळे शुक्रवारी सकाळी पुणे-नाशिक मार्गावरील नांदुर खंदरमाळ फाट्यावर रास्ता रोको केला जाणार असल्याची माहिती आंदोलक शेतकऱ्यांनी दिली. यावेळी इंद्रजीत खेमनर, जयराम ढेरंगे, सचिन खेमनर, भाऊसाहेब डोलनर, सुदाम सागर, रामदास धुळगंड, गणेश सुपेकर, उत्तम कुदनर, भाऊसाहेब सागर, विठ्ठल भागवत, पांडुरंग सागर, शिवाजी शेंडगे, रफीक चौगुले, रुपेश धुळगंड, दादा पटेल, दादा लोंढे, तुषार धुळगंड आदिंसह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)