संगमनेर – संगमनेर पंचायत समितीत सौर उर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मीती केली जाणार असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येथील पंचायत समिती वीजेच्या बाबतीत बऱ्याच अंशी स्वयंपुर्ण होणार आहे. या प्रकल्पातुन पंचायत समितीला दहा किलोवॅट वीज मिळणार आहे. जवळपास पंच्याहत्तर टक्के विजेचा खर्च वाचविण्यात पदाधिकारी, अधिकारी यशस्वी ठरले असल्याने वीजेवरील मोठा खर्च वाचणार आहे.

सहकाराच्या माध्यमातुन राज्यात नावलौकीक मिळविलेल्या संगमनेर तालुक्याने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिशादर्शक विकास कामे निर्माण केली. थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने एकेकाळचा दुष्काळाने ग्रासलेला तालुका आता सहकारच्या बळावर अनेक बाबतीत ‘समृध्द’ झाला. विविध खात्याच्या देखण्या इमारती संगमनेरात थोरात यांच्या नेतृत्वातुनच साकारल्या आहेत. मोठ्या इमारती निर्माण झाल्यानंतर येथील अधिकाऱ्यांना दिमाखात काम करता येऊ लागले.इमारती जश्या देखण्या झाल्या तसेच या इमारतीत वापरल्या जाणाऱ्या वीजेचे बीलदेखील काही हजारात येऊ लागले. त्यामुळे बील भरतांना प्रशासनातील अधिकाऱ्यांची दमछाक होऊ लागली. काही सरकारी कार्यालयांकडे वीज बिलाची थकबाकी झाल्याने त्यांच्यावर वीज तोडणीचे संकट घोगावत असल्याने वीज भरतांना त्यांना खर्चाची हातमिळवणी करावी लागते.

संगममनेर पंचायत समितीची भव्य इमारतदेखील तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणुन ओळखली जाते. दररोज मोठ्या प्रमाणात तालुक्यातुन पंचायत समितीत नागरिकांची ये-जा असते. पंचायत समितीतील अधिकारी,पदाधिकाऱ्यांच्या दालनात मोठी वर्दळ असल्याने येथील वीज व्यवस्थेवरदेखील त्याचा ताण येतो. यातुन पंचायत समितीला दरमहा जवळपास पन्नास ते साठ हजाराचे वीज बिल येते. काटकसरीचे धोरण अवलंबतांना गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सभापती निशा कोकणे आणि उपसभापती नवनाथ अरगडे यांनी आपल्या कार्यालयातील एसी बंद ठेवलेत.

बीडीओ शिंदे, कोकणे आणि अरगडे यांनी वीज बचतीसाठी टाकलेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह असले तरी पंचायत समिती वीजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्याचा निर्णय घेतला. पंचायत समितीला आवश्यक असणारी वीज स्वत:च निर्माण करुन उर्वरित वीज महावितरणला देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेढा’च्या माध्यमातुन संगमनेर पंचायत समितीत दहा किलोवॅट वीज निर्मीती करणारे सोलर पंचायत समितीच्या छतावर लावण्यात आले आहे. यासाठी जवळपास साडेबारा लाख रुपये पंचायत समितीने खर्च केले आहे. यातुन निर्माण होणाऱ्या वीजेतुन पंचायत समितीचा वीजेवरील खर्च जवळपास सत्तर-पंच्याहत्तर टक्के वाचण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)