संगमनेर नगरपालिकेच्या कचरा गाड्या अडविल्या

संगमनेर – येथील नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या गाड्यांमधील कचरा झाकून नेला जात नसल्यामुळे संतप्त झालेल्या विलास गुंजाळ यांनी सहा गाड्या आणि एक ट्रॅक्‍टर अशी सात वाहने तब्बल चार ते पाच तास अडविली.
शहरातील कचरा संगमनेर खुर्द येथील कचरा डेपोवर टाकला जात असल्यामुळे परिसरात त्याची दुर्गंधी सुटते. त्यातच कचरा डेपोवर कचरा नेताना कचरा उचलणारा ठेकेदार कचरा नेताना झाकून न नेता उघड्यावर नेत असल्याचे उघड झाले. बुधवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शिवनेरी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव गुंजाळ हे रस्त्याने जात असताना या कचरा गाड्यांमधील कचरा गुंजाळ यांच्या अंगावर उडाला. त्यानंतर त्यांनी कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीचालकास विचारणा केली असता त्या चालकाने गुंजाळ यांना अरेरावीची भाषा केली. त्यामुळे संतापलेल्या गुंजाळ यांनी सर्व 11 गाड्या सकाळी 11 वाजता अडविल्या. नगरपालिका प्रशासन येथे येत नाही तोपर्यंत गाड्या न सोडण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख पप्पू कानकाटे, युवा सेनेचे अमित चव्हाण आदींनी पाठिंबा दर्शविला.
मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर व प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल, आरोग्य निरीक्षक सुनील मंडलिक यांनी गुंजाळ यांची भेट घेतली असता गुंजाळ यांनी आक्रमकपणा घेत कचरा उचलणाऱ्या गाड्यांची कागदपत्रे आहे का, गाड्यांचा फिटनेस आहे का, चालकांना शिस्त आहे का असे एकामागे एक प्रश्नांचा गुंजाळ यांनी भडिमार केला तसेच कागदपत्रे व फिटनेस नसलेल्या कचरा गाड्या रस्त्यावर येऊ देणार नसल्याचा इशारा गुंजाळ यांनी दिला. मुख्याधिकारी सचिन बांगर व प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल यांनी कचरा ठेकेदाराला कागदपत्रासह बोलावून घेऊ आणि त्यांना ताकीद दिली जाईल, असे सांगितल्यानंतर तब्बल चार ते पाच तासानंतर अडविलेल्या कचऱ्याच्या गाड्या सोडून देण्यात आल्या.

कुणालाही पाठीशी घालणार नाही 
कचरा उचलण्याचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराला तुम्ही पाठीशी घालत असल्यामुळे त्याचे फावले जात आहे आणि त्याचे चालक नागरिकांशी व्यवस्थित वागत नाही. त्यांची मग्रुरी खूप वाढली आहे. त्यामुळे तुम्ही ठेकेदाराला पाठीशी घालू नका, अशी तंबी विलास गुंजाळ यांनी दिली. त्यावर ठेकेदार आमचा कोणी लागत नसून त्याला कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नसल्याचे सांगून त्याने कामात सुधारणा न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)