संगमनेर – संगमनेर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवार दि. २६ रोजी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार,मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर तसेच पालिकेचे नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. सर्वसाधारण सभेत एकूण ५२ विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले . यात प्रामुख्याने शहरात स्थानिक आमदार बाळासाहेब थोरात तसेच आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या निधीतून पूर्ण करावयाच्या विकास कामांचा उल्लेख होता. आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून २० लाख रुपयांची तरतूद यावेळी करण्यात आली.
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या स्थानिक निधीतून विकेंद्रीकृत पद्धतीने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध करणे, शहरातील मोकळ्या जागेत खुली अभ्यासिका उभारणे, शहरातील उद्यानाची देखभाल व दुरुस्तीची कामे ठेकपद्धतीने देणे, निळवंडे प्रकल्प आधारित शहराची पाणी पुरवठा योजना हस्तांतर करणे , शहरात विविध ठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधणे, ओपन जिम उभारणे, जॉगिंग ट्रॅक उभारणे, त्याचबरोबर रस्ते डांबरीकरण व काँक्रीटीकरण करणे यांसह इतर विषयांना सभागृहात यावेळी मंजुरी देण्यात आली.
यावेळी सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी विद्यमान नगरसेवक दिलीप पुंड, विश्वास मुर्तडक, सोनाली शिंदे, रुपाली औटी, सुमित्रा दिड्डी,कुंदन लहामगे सुनंदा दिघे, शमा शेख, शबाना बेपारी, किशोर पवार,सुहासिनी गुंजाळ, राजेंद्र आभंग, मनीषा भळगट, नितीन आभंग, प्रियांका भारितकर, मालती डाके, किशोर टोकसे, योगिता पवार, वृषाली भडांगे,डॉ. दानिश खान, नासिमबानो पठाण, योगेश जाजू आदींनी सहभाग घेतला. सदस्यांकडून विचारलेल्या प्रश्नांना नगराध्यक्षा तांबे,मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी उत्तरे दिली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा