संगमनेरात तीन एटीएम फोडून 22 लाख लंपास

वर्षभराच्या आतच एटीएम फोडीची मोठी घटना : पोलीस प्रशासनापुढे चोरांच्या शोधाचे आव्हान

संगमनेर – संगमनेर उपनगरातील मालदाड रस्त्यावरील कॅनरा बॅंकेचे एक आणि ऑरेंज कॉर्नरवरी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे दोन असे तीन एटीएम मशीन चोरट्यांनी गॅस कटरच्या सहायाने फोडले. एटीएममधील तब्बल 22 लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांनी यापूर्वीदेखील ऑरेंज कॉर्नरच्या याच एटीममधून 26 लाख लांबविले होते.
चोरीचा तपास लावण्यात पोलीस अपयशी ठरले असतानाच आता पुन्हा चोरट्यांनी नव्या निरीक्षक आणि पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अशोक थोरात, निरीक्षक अभय परमार आणि अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी भेट दिली.

-Ads-

गुरुवारी मध्यरात्री झालेल्या या चोरीसंदर्भात बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी चोरी झालेल्या रकमेची मोजदाद केल्यावर दुपारी फिर्याद दिली. मालदाड रस्त्यावरील कॅनरा बॅंकेच्या एटीएम मशीनमधून 2 लाख 62 हजार 900 रुपये तर ऑरेंज कॉर्नरवरील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दोन एटीएम मशीनमधून 19 लाख 42 हजार 300 रुपये अशी एकूण 22 लाख 5 हजार 200 रुपयाची रोकड लंपास केली. स्टेट बॅंकेच्या व्यवस्थापकांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

विशेष म्हणजे यातील ऑरेंज कॉर्नरवरील एटीएम सेंटर यापूर्वीदेखील 7 नोव्हेंबर 2017 रोजी फोडण्यात आले होते. याच्या जोडीने शहरातील पेटीट कॉलेजजवळील एटीएम मशिनदेखील फोडण्यात आले होते. याचा तपासदेखील अद्याप पोलिसांनी लागलेला नसतानाच नऊ महिन्यांनी पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचे धाडसी काम चोरट्यांनी केले. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने चोऱ्या होत असताना यापैकी बहुतांश चोऱ्यांचा तपास पोलिसांना लागलेला नाही. पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून प्रभारी राज सुरू आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारीदेखील फारशा गांभीर्याने काम करताना दिसत नाहीत. शहर पोलीस ठाण्याचा प्रभारी पदभार अभय परमार या नव्या निरीक्षकांकडे काही दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोपविला.

नव्या निरीक्षकांसमोर अनेक आव्हाने असतानाच शहरातील चोऱ्यांचे सत्रदेखील काही दिवसांपासून वाढले होते. या चोऱ्यांचा तपास लावण्यास शहर पोलीस अपयशी ठरले. पोलिसांनी नुकतेच नऊ तोळे सोने हस्तगत करून नागरिकांना दिलासा देण्यासा प्रयत्न केला. मात्र आता पुन्हा एकदा पोलिसांना आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

सीसीटीव्ही तोडून चोरी

ऑरेंज कॉर्नर आणि मालदाड रस्त्यावरील एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटीव्हीचे कॅमेरे तोडले. तर ऑरेंज कॉर्नरवरील एटीएममधील एटीएम मशिनच फोडल्यानंतर ते बाहेर रस्त्यावर फेकून देत तेथून पोबारा केला. मात्र उशिरापर्यत पोलीसांच्या हाती कोणतेही धागेदोरे मिळालेले नसल्याने या चोरीचा तपासदेखील पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)