संगमनेरात एकाच दिवशी धूमस्टाईलने चार चोऱ्या

संगमनेर – शहरात धूमस्टाईल चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी चार चोऱ्या त्याही जिल्हा पोलीसप्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या नियोजित दौऱ्याच्या उपस्थितीत झाल्याने त्यांना सोनसाखळी चोरांनी एक प्रकारे सलामीच दिली आहे. यासंदर्भात शहर पोलिसांत फक्‍त दोनच घटनांचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दीपाली गजानन खाडे (वय 32) रा. गोल्डन सिटी या डॉ. जठार हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्या स्कुटी दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी हॉस्पिटलच्या दिशेने निघाल्या होत्या. जाणता राजा मैदान येथील ऍक्‍सीस बॅंकेजवळून जात असताना काळ्या रंगाच्या विनानंबरच्या पल्सर मोटारसायकलवरून दोघा चोरट्यांनी येवून त्यांच्या गळ्यातील 63 हजार रुपयांचे 2 तोळ्याचे गंठण चोरून नेवून पोबारा केला. त्यांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. ही घटना होत नाही तोच दुपारी 1 वाजेच्या सुमारास राहुरीचे पत्रकार निसार मकबूल सय्यद (वय 53) रा. राहुरी स्टेशन यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट अज्ञात चोरट्याने बसस्थानकातून लांबविले. सय्यद यांना मणक्‍याचा त्रास असल्याने ते येथील डॉ. सोमेश वैद्य यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. उपचार पूर्ण झाल्याने सय्यद राहुरीला जाण्यासाठी बसस्थानकात गेले होते. नाशिक-सोलापूर बसमध्ये ते चढत असताना पुढे एक विद्यार्थिनी व वृध्द महिला गर्दीत चेंगरू नये म्हणून त्यांना वाचविण्यास गेले असता अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील 75 हजार रुपयांचे 3 तोळे सोन्याचे लॉकेट लांबविले.
यासंदर्भात दीपाली गजानन खाडे व निसार मकबूल सय्यद यांनी शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. डी. माळवदे व हे. कॉ. सुरेश बनसोडे करीत आहेत. तर, साईश्रध्दा चौकात सौ. भारती बाळासाहेब गायकवाड या महिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी लांबविल्याचे वृत्त आहे. शहरातील आणखी एका ठिकाणी चोरी झाल्याचे समजते. मात्र, इतर दोन ठिकाणच्या चोरीची तक्रार काल उशिरापर्यंत शहर पोलिसांत दाखल नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)