संगमनेरात अनधिकृत बांधकामे हटाव मोहिम दुसऱ्या दिवशीही सुरुच

संगमनेर – शहरातील विना परवानगी बांधकामे हटविण्याचे काम दुसऱ्या दिवशीदेखील सुरुच होते. गुरुवारी ( दि.31) पालिकेने नवीन नगर रस्त्यावरील राजेश राठी यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली. या कारवाईत शहरातील जवळपास पाच बांधकामे पाडण्यात आली असून यात काही पक्क्‌या बांधकामांचा समावेश होता. अनधिकृत बांधकामाविरोधात पालिकेने कारवाईचा फास आवळला असल्याने अनेकांनी या कारवाईचा धसका घेतल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी शहरात कारवाई अस्त्र सुरु केले. पहिल्या दिवशी पथकाने शहरातील दोन पक्क्‌या बांधकामांना हात घातल्यानंतर गुरुवारी पाच बांधकामांवर कारवाई सुरु होती. नवीन नगर रस्त्यावरील राजेश राठी, चंद्रशेखर चौकातील सराफ, परदेशपुरा येथील पत्र्याची शेड, जेधे कॉलनी आणि देवाचा मळा येथील बांधकामावर पथकाने कारवाई केली. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यात अडथळा ठरणारी आणि विना परवानगी बांधकामे तोडण्यात आली. दरम्यान अनधिकृत, विनापरवानगी, परवानगीपेक्षा अधिक बांधकामे करणाऱ्यांना पालिकेने अशी बांधकामे स्वत:हून काढून घेण्यासाठी नोटीसा बजावत अवधी दिला आहे. मात्र तरीदेखील नोटीसांना न जुमानता बांधकामे करणाऱ्यांवर कारवाई सुरु केली आहे. मोठा लवाजमा घेऊन कारवाई करणाऱ्या या पथकात नगर अभियंता एस. बी. सुतावणे, रचना सहायक कुलदीप पाटील, बांधकाम पर्यवेक्षक पंकज मुंगसे, सोनल गाडेकर, बांधकाम विभागाचे दत्तात्रय गवांदे, अश्‍विन पुंड, सुनील कळसकर, सतीष बुरगुले, संपत मेहत्रे, अतिक्रमण विभागाचे राजेंद्र सुरग, अल्ताब शेख, अकलाख शेख, राजेंद्र गुजर, बाळु कुळधरण, दारोळे आदिंचा समावेश होता.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)