संगमनेर – संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे शहर पोलिसांनी छापा टाकत १ लाख १० हजार रुपये किंमतीचे ११०० किलो गोमांस पकडले. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जमजम कॉलनी या ठिकाणी समीर नुरमहंमद शेख (रा.भारतनगर) व इतर तिघे (नावे समजू शकली नाही) यांच्याकडे बेकायदेशीररित्या अकराशे किलो गोमांस असल्याची माहिती खबऱ्यामार्फत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना समजली होती. पोलिस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलिस हेड कॉन्स्टेबल ईस्माईल शेख बाळासाहेब अहिरे,गोरक्ष शेरकर यांनी त्या ठिकाणी जाऊन गुरुवारी मध्यरात्री १२.१० वाजता छापा टाकला.
यावेळी पोलिसांना पाहून चौघेही फरार झाले आहेत. एकूण १ लाख १० हजार रुपये किंमतीचे हे ११०० किलो गोमांस आहे. याप्रकरणी पोलिस नाईक विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी वरील चौघांविरुद्ध महाराष्ट्र गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय वाघमारे हे करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा