संगमनेरमध्ये आखाड पार्ट्यां रंगल्या

संगमनेर – आखाड महिन्याचा उत्तरार्ध सुरु झाला असून संगमनेर शहरासह ग्रामीण भागात “आखाड पार्ट्यां’नी जोर धरला आहे. विविध मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी होत असून शेतांमध्येही आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत.
आषाढ महिन्यात (आखाड) मोठ्या प्रमाणात मांसाहारी पदार्थ खाण्यावर भर असतो. अनेक जण घरगुती मांसाहाराचा बेत करुन आखाड साजरा करतात. मात्र, गेल्या काही वर्षात आखाड महिना इव्हेंट झाला आहे. सध्या कुटुंबीय, मित्र-मंडळी, कार्यालयातील सहकारी यांच्यासोबत एकत्र येऊन आखाड साजरा करण्याकडे कल वाढला आहे.
त्यामुळे अनेकजण आखाड साजरा करण्यासाठी विविध मांसाहारी हॉटेलांना पसंती देत आहेत. संगमनेर तालुक्‍यातील पुणे-नाशिक व कोल्हार घोटी महामार्गालगतची मांसाहारी हॉटेलांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या भागातील मांसाहारी हॉटेलात खवैय्यांची गर्दी वाढू लागली आहे. तर अनेक जण गावरान पद्धतीने शेतांमध्ये आखाड पार्ट्या करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळेच या भागातील शेतांमध्ये आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. आखाड महिना संपण्यास एक आठवडा बाकी असल्याने आखाड पार्ट्यांनी जोर धरला आहे.
सुपातलं मटन, गावरान कोंबडा, काळ्या रस्स्यातील मटन, मटन-चिकन दम बिर्याणी, मच्छी फ्राय या पदार्थांना हॉटेलांमधुन मागणी आहे. तर अनेकजण शेतात चुलीवर गावरान पद्धतीने बनविलेल्या मटन भाकरीवर ताव मारून आखाड साजरा करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)