संगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग एक)

सहकार आणि संगमनेर या दोन शब्दांचा खऱ्या अर्थाने मिलाफ झाला असेल तर तो येथील समृध्दीत. एकेकाळी दुष्काळी आणि दंगलीचे शहर अशी राज्यात ओळख असलेले संगमनेर आज राज्याच्या सहकारात दिशादर्शक काम करत आहे. सहकाराचा पाया आणि त्या पायावर मिळालेली समृध्दता आज केवळ संगमनेरातच अनुभवण्यास मिळते. कॉम्रेड दत्ता देशमुख, माजी मंत्री बी. जे. खताळ, भाऊसाहेब थोरात या सहकारातील धुरंधरांच्या पावलावर पाऊल टाकत येथील सहकाराच्या विकासाचे खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब थोरात समृध्द वारसदार ठरले आहेत.

गेल्या काही दशकांपासून “थोरात’ या एकाच नावाभोवती येथील राजकारण फिरत आहे. माजी आमदार भाऊसाहेब थोरात यांनी येथील सहकाराचा पाया भक्कम करत संगमनेरकरांची आर्थिक उन्नती करण्यासाठी हातभार लावला, तर आमदार बाळासाहेब थोरात यांनी या पायावर भक्कम अशी अभेद्य तटबंदी निर्माण करत कळस चढविला आहे. संगमनेरमधून सातत्याने विक्रमी मतांनी मिळणारा विजय त्यांचे यशस्वी नेतृत्व अधोरेखित करते. कॉंग्रेस फुटीच्या काळात कॉंग्रेसबरोबर ठाम राहणाऱ्या दिवंगत भाऊसाहेब थोरातांनी दिलेल्‌ शिस्तीच्या बळावर 2014 नंतरच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे बालेकिल्ले ढासळत असताना आणि त्यानंतरच्या कॉंग्रेसच्या सर्वत्र होणाऱ्या पडझडीच्या काळातदेखील या पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी धडपडणारा नेता आज थेट दिल्लीत संगमनेरचा आवाज बुलंद करतोय.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना राजकारणात आदर्श मानणारा संगमनेरकरांचा हा नेता आज खऱ्या अर्थाने त्यांचा समृध्द वारसदार ठरला आहे. भाऊसाहेब थोरात आणि यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांच्या शिदोरीवर राजकारणातील एकेक पल्ला लीलया पार करत आहे. संगमनेरात थोरात यांना त्यांच्या विरोधकांकडून राजकीय विरोध होत असला तरी त्यांना संगमनेरकरांनी प्रत्येक वेळी दिलेल्या विक्रमी मताधिक्‍याच्या विजयाने हा विरोध त्यांच्या नेहमीच पथ्यावर पडत आला आणि विरोधकांविषयी संगमनेरकरांच्यात संशय निर्माण करणारा ठरला. दत्ता देशमुख, माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांनी संगमनेरचे प्रतिनिधीत्व दीर्घकाळ केले. त्यापाठोपाठ बाळासाहेब थोरात दीर्घकाळ प्रतिनिधीत्व करणारे नेते ठरले आहेत.

मुख्यमंत्रिपदाची संधी चालून आल्यानंतर ती नाकारणारे बी. जे. खताळ पाटील आणि थेट मुख्यमंत्रिपदापर्यतच्या प्रभावी नेतृत्वात मजल मारणारे बाळासाहेब थोरात संगमनेरकरांचे खरे प्लस पॉईंट आहेत. या दोन्ही नेत्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात काम करताना अनेक खात्याच्या मंत्रिपदाची संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत कोणत्याही आरोपाचा एकही डाग लागू न देणारे हे दोन्ही नेते सातत्याने राज्यासोबतच संगमनेरच्या विकासासाठी आणि मिळालेल्या खात्यांना लोकाभिमुख करण्यासाठी काम करणारे ठरले. 1985 ते आजपर्यंत संगमनेरचे एकहाती नेतृत्व करणाऱ्या थोरात यांना कॉंग्रेसमध्ये आज मानाचे पान मिळताना दिसते. कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून संगमनेरातील घराघरात संवाद कायम ठेवणाऱ्या थोरात यांचा मोदी लाटेत कॉंग्रेस निष्प्रभ होत असताना पक्षालादेखील मोठा फायदा झाला. त्यामुळेच त्यांच्यावर गुजरात निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

नितीन शेळके

प्रतिनिधी, संगमनेर

 

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)