संकेतस्थळासाठी दोन लाख रुपये मोजणार

पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम : मेडीकल कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वायसीएम रुग्णालयात सुरु केल्या जाणाऱ्या पदव्युत्तर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम संस्थेचे संकेतस्थळ (वेबसाईट) सुरू केले जाणार आहे. त्यावर सुमारे दोन लाखांचा खर्च होणार आहे.

येत्या मंगळवारी (दि.14) होणाऱ्या साप्ताहिक सभेच्या मान्यतेकरिता हा विषय ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो नागरिकांवर अल्पदरात वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातात. मात्र, रुग्णांची संख्या दिवसें-दिवस वाढतच आहे. परिणामी रुग्णांना ही सेवा पुरविताना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. ही बाब लक्षात घेत, पुण्याच्या ससुन सर्वोपचार रुग्णालयातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या धर्तीवर वायसीएम रुग्णालयात पदव्युत्तर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम सुरु केला जाणार आहे. त्यामुळे वायसीएममधील रुग्णांना उपचारासाठी या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे डॉक्‍टर उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, ही संस्था सुरु करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मान्य केला असून, मेडीकल कौन्सिल ऑफ इंडिया मार्गदर्शक तत्वानुसार तसेच “स्कोप ऑफ वर्क’ निश्‍चित करण्यासाठी झालेल्या समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता निविदा मागविण्यात आल्या असून चिंचवड येथील टेक-नाईन सर्व्हिसेस या ठेकेदार कंपनीने ही वेबसाईट तयार करण्याची तयारी दर्शवली आहे. 1 लाख 92 हजार रुपये खर्चाचे दरपत्रक त्यांनी सादर केले आहे. त्यानुसार ही स्वतंत्र “वेबसाईट’ सुरु करण्याचा तसेच त्यासाठी येणाऱ्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव स्थायीच्या मान्यतेकरिता ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)