संकटकाळात वन्यप्राण्यांच्या मदतीसाठी “रेस्क्‍यू पथक’

सहा रेंजचे वनाधिकारी, सुरक्षारक्षक आठ माजी सैनिकांचा सहभाग

– गायत्री वाजपेयी

पुणे – विविध नैसर्गिक अथवा मानवनिर्मित आपत्तींमुळे संकटात सापडलेल्या वन्यप्राण्यांच्या बचावासाठी आता माजी सैनिक सरसावणार आहेत. पुणे वनविभागातर्फे यासाठी एक विशेष रेस्क्‍यू पथक स्थापन केले असून यामध्ये सुमारे 8 माजी सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे वन्यप्राण्यांच्या बचावकार्यात अचूकता तसेच अधिक शिस्तबद्धता येईल, असा दावा वनविभागातर्फे करण्यात आला आहे.

पाण्याच्या शोधात भटकंती करताना विहिरीत पडलेले वन्यप्राणी, जंगलातील वणव्यात अडकलेले वन्यप्राणी अथवा अन्य काही कारणांमुळे संकटात सापडलेल्यांचा बचाव करणे हे वन विभागासाठी मोठे आव्हानात्मक काम असते. भीतीमुळे भेदरलेले प्राणी सातत्याने हालचाल करत असल्याने त्यांच्यावर नियंत्रन मिळविणे कठीण असते. तसेच अशा परिस्थितीत त्यांचा पाठलाग करणे अथवा त्यांना डार्ट (भुलीचे इंजेक्‍शन) मारणे अवघड होते. या कामात सुसूत्रता यावी, तसेच अचूकपणे निशाणा साधत वन्यप्राण्यांना बेशुद्ध करता यावे यासाठी आता माजी सैनिकांची मदत घेतली जाणार असून पुणे वनविभागाने नुकतीच एक पंधरा सदस्यांचे विशेष बचाव पथक स्थापन केले आहे. यात जिल्ह्यातील सहा रेंजचे वनाधिकारी, सुरक्षारक्षक तसेच 8 माजी सैनिक असणार आहेत.

सैनिकांना जंगलात काम करण्याचा अनुभव असतो. तसेच नेमबाजी, धावणे या सर्वांमध्ये ते कुशल असतात. त्यामुळे या कामासाठी त्यांची मदत घेणे नक्कीच फायदेशीर ठरेल. बचाव कार्यासाठी आवश्‍यक अशी सर्व साधनसामग्री या पथकाकडे उपलब्ध असून, सध्या या पथकाचे पशुवैद्यकीय विषयाचे प्रशिक्षण चालू असून लवकरच ही टीम प्रत्यक्ष कामासाठी सुरवात करेल. एखाद्या आपत्तीच्या वेळी या टीमला पाचारण कण्यात येईल. त्यानंतर ही टीम संबंधीत ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बचावाचे कार्य करेन.

– महेश भावसार, सहायक उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग

वणव्यांसाठीदेखील विशेष पथक
शहरात विविध ठिकाणी वणवे पेटण्याची घडना घडत असते. मात्र, अनेकवेळा प्रत्यक्ष स्थळापासून दूर असल्याने अथवा अन्य कामांमध्ये व्यस्त असल्याने वनाधिकाऱ्यांना वणव्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होतो. आग विझविण्यासाठी उशीर झाल्याने ती आग पसरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी बचाव पथकाच्या धर्तीवर फॉरेस्ट फायरसाठीदेखील विशेष पथक तयार करण्याचे वनविभागाचे प्रयत्न असून लवकरच या संदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचे महेश भावसार यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)