श्‍वानाने रस्त्यावर शौच केल्यास मालकास दंड

महापालिका देणार दणका : उद्यापासून सुरू होणार कारवाई

पुणे – रस्त्यावर पाळीव श्‍वानाला अर्थात कुत्र्याला फिरवण्यासाठी नेत असाल, तर तुमच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्याने सकाळी किंवा रात्री रस्त्यावर शौचास आणल्यास किंवा कुत्र्याने शौच केल्यास जागेवर 500 रुपये दंड कुत्रामालकाला द्यावे लागणार आहेत. गुरूवारपासून या कारवाईला सुरूवात केली जाणार आहे.

रस्त्यांवर घाण करणाऱ्या कुत्रेमालकांना धडा शिकवण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहे. थुंकीबहाद्दर, रस्त्यावर शौच किंवा लघुशंका तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईला महापालिकेने सुरूवात केली आहे. आता कुत्र्यांच्या रस्त्यावर करण्यात येणाऱ्या शौचावरही निर्बंध येणार आहेत.

अनेकजण सकाळी कुत्र्याला बाहेर फिरवण्यासाठी आणतात. स्वत:ला घरात घाण नको आणि ती काढायची तसदी नको म्हणून रस्त्यावरच त्याला शौच करण्याची सवयही अनेकांनी लावलेली असते. त्यामुळे सकाळी कुत्र्यांना घेऊन अनेकजण बाहेर पडतात.

अशांवरच महापालिकेच्या आरोग्य निरीक्षकांद्वारे गुरूवारपासून कारवाईला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कुत्रामालकाला फिरताना कुत्र्यासोबत “पूप स्कूपर’ (विष्ठा उचलण्याचे साधन) ठेवावा लागणार आहे. तो नसला आणि कुत्र्याने रस्त्यावर नैसर्गिक विधी केल्यास ती विष्ठा तुम्हालाच उचलावी लागणार आहे. तसे न केल्यास 500 रुपये दंड भरण्यासाठी तयारी मात्र ठेवावी लागेल.

शहराच्या अनेक भागांत सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, फूटपाथवर नागरिक आपल्या कुत्र्याला फिरवायला घेऊन येतात. कुत्रा रस्त्यावर नैसर्गिक विधी करतो. यामुळे सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ होण्यासोबतच अनारोग्याचा प्रश्नही उद्भवू शकतो. या अनुषंगाने रस्त्यावर शौच करणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांनी ही घाण साफ करावी, असा आदेश महापालिका प्रशासनाने दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)