• 16 एप्रिल रोजी गुंफले जाणार वसंत व्याख्यानमालेतील पाहिले पुष्प

लोणावळा (वार्ताहर) – लोणावळेकर रसिक वर्षभर ज्या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. त्या वसंत व्याख्यानमालेतील पाहिले पुष्प येत्या सोमवारी (दि. 16) गुंफले जाणार आहे. 16 ते 21 एप्रिल दरम्यान एकूण सहा दिवस सुरू राहणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने ऐकण्याची संधी लोणावळेकरांना मिळणार आहे.

गेली 15 वर्षे सातत्याने लोणावळा शहरात वसंत व्याख्यानमाला या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या वसंत व्याख्यानमाला समितीचे हे 16 वे वर्ष आहे. ऍड. बापुसाहेब भोंडे विद्यालयाच्या आवारात होणार आहे. या व्याख्यानमालेचे पाहिले पुष्प सोमवार (दि.16) महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांच्या “श्री विठ्ठल, एक सनातन कोडे’ या व्याख्यानाच्या रूपाने गुंफले जाणार आहे.

दुसरे पुष्प मंगळवारी (दि.17) चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक सतीश राजवाडे “मराठी चित्रपट सृष्टीची आताची वाटचाल आणि याच चित्रपट सृष्टीने काही वर्षांपूर्वी अनुभवलेला खडतर प्रवास’ या विषयाच्या रूपाने गुंफणार आहे. व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प बुधवारी (दि. 18) डॉ. हिमगौरी वडगांवकर या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित “क्रांतिसूर्य स्वा. सावरकर’ व्याख्यानाच्या रूपाने गुंफणार आहे.

गुरुवारी (दि.19) व्याख्यानमालेतील चौथ्या पुष्पाच्या रूपाने सुप्रसिद्ध लेखिका दीपा देशमुख या ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावर संवाद साधणार आहे. व्याख्यानमालेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (दि. 20) “जीवनातील विनोदाचे महत्त्व’ विषयाद्वारे महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी हे विनोदामुळे माणसाचे जीवन कसे हलके फुलके होते हे सांगणार आहे.

व्याख्यानमालेच्या शेवटच्या सहाव्या दिवशी ओमकार निर्मित स्वरगंधा मराठी वाद्यवृंदाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार असून या कार्यक्रमाला शास्त्रीय गायिका नेहा पंडित या उपस्थित राहणार आहे. या सर्व कार्यक्रमाची माहिती नुकत्याच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वसंत व्याख्यानमाला समितीचे अध्यक्षा प्रशांत पुराणिक यांनी दिली. यावेळी समितीच्या राधिका भोंडे, बापू पाटील, प्रगती साळवेकर, संजय गायकवाड, संजय वाढ, आनंद गावडे, प्रमोद देशपांडे, रवींद्र देशपांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)