मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे याने बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट देवून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. “गोलमाल’ सिरीजमध्ये त्याने अजय देवगनसोबत उत्कृष्ट अभिनय साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहे. आता तो पुन्हा एकदा मराठी चित्रपटात झळकणार आहे.
महाराष्ट्रामध्ये सध्या विठ्ठू माऊलीवर आधारित “विठ्ठल’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. यात अभिनेता सचित पाटील विठ्ठलाची भूमिका करणार आहे. तर बऱ्याच काळानंतर अभिनेता श्रेयस तळपदे देखील मराठीत चित्रपटात भूमिका साकारत आहे. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत आणि स्फूर्तीस्थान असलेल्या श्री विठ्ठलावर आधारित “विठ्ठल’ या चित्रपटातील “विठ्ठला विठ्ठला’ हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले असून या गाण्यामध्ये श्रेयस झळकला आहे.
या गाण्यासाठी 25 फूट उंच अशी विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात आली असून 250 डान्सर सोबत ढोल ताशा पथक देखील दिसून येत आहे. या गाण्याच्या शेवटी विठ्ठलाच्या रुपात अभिनेता सचित पाटील प्रेक्षकांना दिसून येत आहे. हिंदीतील लोकप्रिय गायक विशाल दादलानीचा आवाज या गाण्याला लाभला असून गुरु ठाकूर यांनी हे गाणे लिहीले आहे. तर राजू सरदार यांनी संगीतबद्ध केले आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा