श्री छत्रपती कारखान्याची गेटकेन उसावर भिस्त

बीड, गेवराईतून ऊस वाहतूक : पृथ्वीराज जाचक यांनी मांडला साखर उतारा, गाळपाचा लेखाजोखा

भवानीनगर- श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात पाण्याचा तुटवडा असताना व पावसाळा सुरु होईपर्यंत फक्‍त दोनच पाळ्या होणार आहेत. यामुळे सभासदांचा ऊस 100 टक्‍के गाळप होण्याची गरज आहे. परंतु बीड, गेवराईपासून येणारा ऊस हा दहा कारखाने ओलांडून येत आपल्याकडे येत आहे. श्री छत्रपती साखर कारखान्याचे अजब नियोजन सुरू असल्याने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद संतप्त झाले आहेत. परजिल्ह्यातील ऊस गाळप येत आणले जात आहे. यामागचे नेमके गौडबंगाल काय, असा घणाघाती आरोप माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे पृथ्वीराज जाचक यांनी केला.
श्री छत्रपती साखर कारखाना सुरू होऊन 38 दिवस झाले तरी अद्याप एफआरपी प्रतिटन 2500 रुपयांप्रमाणे बिल सभासदांना दिलेली नाही. त्यामुळे सभासदांमध्ये ऊस कोणत्या कारखान्याला द्यावयाचा याबाबत संभ्रम आहे. संचालक मंडळाने त्वरित एकरकमी 2500 रुपये एफआरपीची घोषणा करून पैसे वर्ग करावेत, अशी सभासदांची मागणी आहे. कारखान्याचे विस्तारीकरण सभासदांसाठी केले का गेटकेन उसासाठी केले, याबाबत सभासदांतून सवाल उमटत आहे.
सध्या कारखान्याला बीड व गेवराई भागातील ऊस प्रतिदिन 30 टक्‍क्‍यांपेक्षा जादा येत आहे. या उसाची रिकव्हरी ही सभासदांच्या ऊसापेक्षा कमी आहे. त्यामुळे तोटा होऊन ऊस भावावर निश्‍चितपणे परिणाम होण्याची शक्‍यता आहे. हा ऊस आणताना 40 किलोमीटरपर्यंतची वाहतूक कारखाना सोसणार आहे, असे समजते. श्री छत्रपती साखर कारखान्याची वाहतूक ही सरासरी 23 किलोमीटर इतकी आहे. 40 किलोमीटर वाहतूक सोसल्यामुळे 17 किलोमीटरचा फरक हा प्रतिटन अंदाजे 68 रुपये 28 पैसे इतका होणार आहे.
प्रतिदिन रुपये 1 लाख 36 हजार 560 इतके पैसे जादा जाणार आहेत. याशिवाय रिकव्हरीचा तोटा वेगळाच आहे. तोडणी वाहतूक यंत्रणा क्षमतेप्रमाणे उभी करण्यात संचालक मंडळ अपयशी ठरलेले आहे. बीड व गेवराईचा ऊस त्यांच्या वाहनांसहित आणण्यामागे हे अपयश झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे. गेटकेन उसाच्या रिकव्हरीबाबत विचारले असता त्यांना रिकव्हरीवर पेमेंट काढणार आहोत, असे बेजबाबदार उत्तर दिले जाते, असाही आरोप जाचक यांनी केला.
सहवीजनिर्मिती प्रकल्प अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू नसून एकूणच कारखान्याचे होणारे गाळप, उतारा व इतर तांत्रिक बाबींचा अभ्यास केल्यास कारखाना व पर्यायाने सभासद मोठ्या अडचणीत जाण्याबाबतची शंका वाटते. कारखान्याच्या वरील सर्व बाबतीत जाहीर चर्चा करण्यासाठी भवानीनगर शेतकरी कृती समितीची तयारी आहे. यावेळी बाळासाहेब कोळेकर, शिवाजीराव निंबाळकर, विशाल निंबाळकर, सतीश काटे, बाळासाहेब रायते, ऍड. प्रदीप थोरात आदी उपस्थित होते.

  • घाट्यातील व्यवहार
    श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अद्याप निवड झाली नाही. त्यात गाळप हंगाम सुरू असताना कारखान्यातील नियोजनशून्य कारभार चव्हाट्यावर आला आहे. त्याचा परिणाम गाळप क्षमतेवर होत असल्याची चर्चा सभासदांमध्ये सुरू आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस क्षेत्र मुबलक असताना तसेच बीड, गेवराई भागातील साखर उतारा कमी असताना कारखाना ऊस गाळप का करीत आहे, असा खडा सवाल सभासद करीत आहे. कारखान्याचा हा घाट्याचा व्यवहार आर्थिक क्षमतेवर होणार आहे. त्यामुळे कारखान्याचे अर्थकारण डळमळीत होण्याचा धोका नाकारता येत नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)