श्रीलंकेवर पुन्हा फालोऑनची नामुष्की; भारताची सामन्यावर पकड

कुलदीप यादवचे चार बळी ः दुसऱ्याच दिवशी भारताची सामन्यावर पकड

कॅंडी – हार्दिक पांड्याने केलेल्या झंझावती शतकानंतर कुलदीप यादवने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशीच यजमान श्रीलंकेवर सलग दुसऱ्यांदा फालोऑनची नामुष्की ओढावली. भारताने दिलेल्या 487 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 135 धावांतच गुंडाळला. त्यानंतर दुसऱ्या डावातही लंकेच्या डावाची खराब सुरुवात झाल्याने दुसऱ्या दिवसाअखेर एका विकेटच्या मोबदल्यात 19 धावा केल्या आहेत. ते अजूनही भारतापेक्षा 333 धावांनी पिछाडीवर आहेत.

भारताने दिलेले 487 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या कर्णधार दिनेश चंडीमल याचा अपवाद वगळता पहिल्या डावात एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. सलामीच्या जोडीला झटपट बाद करत मोहम्मद शमीने श्रीलंकेला सुरूवातीलाच दोन धक्‍के दिले. सलामीवीर उपुल थरंगा (5) यष्टीरक्षक साहाच्या हाती झेल देऊन बाद झाला. पाठोपाठ दिमुथ करुणरत्नेही (4) शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

त्यानंतर दिनेश चंडीमल आणि कुशल मेंडीस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुशल मेंडीस धावबाद झाला आणि श्रीलंकेला तिसरा धक्का बसला. यानंतर लगेचच दुसऱ्या षटकात हार्दिक पांड्याने अँजलो मॅथ्यूजला बाद करत श्रीलंकेला चौथा धक्का दिला. मात्र यानंतर निरोशन डिकवेला आणि दिनेश चंडीमल यांनी श्रीलंकेच्या डावाला काहीसे स्थैर्य दिले. डिकवेलाने काही सुंदर फटके खेळत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 63 धावांची अर्धशतकी भागीदारी केली.

ही जोडी श्रीलंकेच्या डावाला स्थैर्य देणार असे वाटत असतानाच कुलदीप यादवने प्रथम निरोशन डिकवेला आणि नंतर दिलरुवान पेरेराला बाद करत श्रीलंकेला लागोपाठ पाचवा आणि सहावा झटका दिला. यानंतर मलिंदा पुष्पकुमारा आणि विश्वा फर्नांडोचा त्रिफळा उडवत कुलदीप यादवने श्रीलंकेची अवस्था आणखी बिकट केली.
त्याआधी आर. अश्विनने लंकेकडून एकाकी झुंज देणाऱ्या कर्णधार दिनेश चंडीमलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. यानंतर आर. अश्विनने शेवटच्या फलंदाजाला बाद करत श्रीलंकेचा डाव 135 धावांमध्ये गुंडाळला. भारताकडून कुलदीप यादवने 40 धावांत 4 बळी घेतले. त्याला मोहोम्मद शमी आणि आर. अश्विनने प्रत्येकी दोन विकेट घेऊन चांगली साथ दिली. तर शतकवीर हार्दिक पांड्यानेही एक विकेट घेत गोलंदाजीत आपली चमक दाखवली.

संक्षिप्त धावफलक
भारत- पहिला डाव 122.3 षटकांत सर्वबाद 487
श्रीलंका – पहिला डाव 37.4 षटकांत सर्वबाद 135 ः (दिमुथ करुणारत्ने 4, उपुल थरंगा 5, कुशल मेंडिस 18, दिनेश चंडिमल 48, अँजेलो मॅथ्यूज 0, निरोशन डिकेवेला 29, दिलरूवान परेरा 0, मलिंदा पुष्पकुमारा 10, लक्षण संदाकन 10, विश्‍वा फर्नांडो 0, कुमारा नाबाद 0. मोहम्मद शमी 17-2, उमेश यादव 23-0, हार्दिक पांड्या 28-1, कुलदीप यादव 40-4, आर. अश्‍विन 22-2)
श्रीलंका – दुसरा डाव (फालोऑन) 13 षटकांत 1 बाद 19 (दिमुथ करुणारत्ने नाबाद 12, उपुल थरंगा 7, मलिंदा पुष्पकुमारा नाबाद 0. उमेश यादव 3-1, मोहम्मद शमी 7-0, आर. अश्‍विन 5-0, कुलदीप यादव 4-0)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)