श्रीराम मंदिर जिर्णोद्धारानिमित्त कलश व मुर्त्यांची मिरवणूक

लोणावळा : श्रीराम मंदिर जिर्णोद्धारानिमित्त गवळीवाडाच्या वतीने काढण्यात आलेली कलश मिरवणूक.

लोणावळा, (वार्ताहर) – गवळीवाडा येथील पुरातन व जागृत श्रीराम मंदिराच्या जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्त मंगळवारी (दि. 20) भांगरवाडी येथील श्रीराम मंदिर ते गवळीवाडा राम मंदिर दरम्यान कलश व मुर्त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. पारंपारिक वाद्यांच्या सुरांमध्ये तब्बल साडेतीन तास हा सोहळा सुरु होता.

गुढीपाडव्यापासून श्रीराम मंदिर जिर्णोद्धानिमित्त विविध कार्यक्रम व संगितमय भागवत रामकथेला गवळीवाड्यात सुरुवात झाली. गवळीवाडा येथील हे श्रीराम मंदिर शंभर वर्षांहून अधिक जुने असून, त्याच्या उभारणीसाठी दगड, वीटा, माती, सागवानी लाकूड व चुन्याचा वापर केला गेला होता. गेल्या शंभर वर्षात मंदिराची नावलौकीकात सातत्याने भर पडत असल्याने त्याची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे येथील व्यवस्थांचे नूतनीकरण गरजेचे झाले होते. परिणामी, येथील रहिवाशांनी मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्रीराम मंदिर जिर्णोद्धार कमिटीने गेले दोन वर्षे परिश्रम घेऊन हे काम पूर्णत्वास नेले आहे. त्यासाठी गवळीवाडा परिसरातील रहिवाशांसह अनेकांनी वस्तुरुपाने व रोख देणगीद्वारे या जिर्णोद्धारास हातभार लावला आहे, अशी माहिती मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी यांनी दिली. अतिशय सुंदर पद्धतीने या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा व अन्य सर्व धार्मिक कार्यक्रम पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. या सोहळ्या अंतर्गत दि. 18 ते 25 मार्च दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या वेळेत श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दि. 22 मार्चला प्रधान राम परिवार देवता महापूजन व महाअभिषेक होणार आहे. 23 मार्चला (शुक्रवार) प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 25 मार्चला दुपारी साडेबारा वाजता श्रीराम जन्मसोहळा होणार असून, परंपरेनुसार सायंकाळी “श्री’च्या पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. 26 मार्चला कुस्त्याचा आखाडा भरविण्यात येणार आहे, तर 27 मार्च रोजी महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)