श्रीरामपूरमधील 423 जणांनी लाटले शौचालयाचे अनुदान

नगरपालिकेकडून लाभार्थ्यांविरोधात फसवणुकीची तक्रार

नगर: शासनाकडून वैयक्तिक शौचालय योजनेत श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत मोठा घोटाळा झाला आहे. याअंतर्गत अनुदान लाटून शौचालय बांधली नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी लाभार्थ्यांवर शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाने नोंदविले आहेत. नगरपालिका प्रशासनाच्या या भूमिकेमुळे श्रीरामपूरमध्ये खळबळ उडाली आहे. सन 2015 पासून आजपर्यंत श्रीरामपूर नगरपालिका हद्दीतील तीन हजार 314 लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरली होती. त्यापैकी 423 लाभार्थ्यांनी प्रत्येक सहा हजार याप्रमाणे एकूण 25 लाख 38 हजार रूपये अनुदान घेतले मात्र, शौचालये बांधले नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहर हागणदारीमुक्त व शहर स्वच्छ करण्याच्या उद्देशाने शासनाची वैयक्तिक शौचालय (आयएचएचएल) योजना राबविण्यात येत असतात. या योजनेअंतर्गत श्रीरामपूर पालिका हद्दीतील वॉर्ड क्र. 1 ते 7 या भागातील लोकांनी केलेल्या अर्जापैकी तीन हजार 314 लाभार्थी पात्र ठरले होते. त्यांना अनुदानाचा पहिला हप्ता सहा हजार रूपये याप्रमाणे त्यांच्या अर्जामध्ये नमूद केलेल्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ शौचालयाचे बांधकाम सुरू करण्याची माहिती पालिकेला तीन महिन्यांच्या कालावधीत कळविणे बंधनकारक असताना 423 लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम सुरू न करता शासनाचे प्रत्येकी सहा हजार रूपये असे एकूण 25 लाख 38 हजार रूपयांचे दिलेले अनुदान स्वत:च्या फायद्याकरिता वापरले.

शौचालयाचे काम न करताना शासनाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पालिकेचे कर्मचारी राहुल खलिपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शालन पोपट गाढे यांच्यासह 423 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रितेश राऊत करीत आहेत. इतक्‍या मोठ्याप्रमाणावर लाभार्थ्यांवर याप्रमाणे गुन्हा दाखल होण्याची पहिलीच वेळ असल्याने इतर शासकीय योजनेतील लाभार्थ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. याप्रकरणाची शहरातील नागरिकांमध्ये दिवसभर चांगलीच चर्चा रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)