श्रीरामपूरचे बदलते राजकारण!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते आजपर्यंत राजकारणाने अनेक मातब्बर चेहरे श्रीरामपूरला दिले. येथील मातीने राज्याचे नेतृत्व करणारे व मुख्यमंत्री पदास पात्र असणारे नेते जन्मास घातले. आता त्यांच्याच उदरी जन्मास आलेली तरुण पिढी तालुक्‍याच्या राजकारणाचा रथ पुढे नेऊ पाहत आहे. संथ, संयमी व विचारपूर्वक केलेल्या राजकारणातून आपापले गड उभे केलेल्या नेत्यांचे वारसदार असलेल्या यंग जनरेशनपुढे मात्र आता वेगळीच आव्हाने उभी ठाकलेली आहेत. बदललेली राजकीय समीकरणे, टॅक्‍नोसॅव्ही मतदार आणि संघटनेचा अभाव पाहता ते या नव्या वादळापुढे कसा तग धरतात हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

अण्णासाहेब शिंदे, बॅ. रामराव आदिक, गोविंदराव आदिक, ज. य. टेकावडे, दौलतराव पवार, भानुदास मुरकुटे, जयंत ससाणे, भाऊसाहेब कांबळे यासारख्या नेत्यांनी आपापल्या कारकिर्दीत नेतृत्वाचा प्रभाव जनमानसावर ठेवला. यातील अनेकांनी तर केवळ आपल्या वक्‍तृत्व चातुर्यावर लाखो लोकांना संमोहित केले. त्यातून संघटनेची मोट बांधली. या सर्वांनी स्थानिक राजकारणाबरोबरच राज्यातील राजकारणातही आपल्या कार्यशैलीद्वारे दबदबा निर्माण केला होता. त्यातूनच श्रीरामपूरची वेगळी ओळख राज्यभर होती आणि आजही आहे.

त्या त्या काळी प्रत्येक लोकप्रतिनिधीला तालुक्‍यातील राजकारणातील प्रतिस्पर्ध्याकडून टोकाचा विरोधही पहावयास मिळाला. मात्र, अनेकदा हेच नेते राजकारण विसरून एकमेकांच्या सुख-दुःखात हजेरीही लावत. यानिमित्ताने या राजकीय विरोधाला माणुसकीची असलेली झालर अनेकदा पुढे आली. गोविंदराव आदिक आणि भानुदास मुरकुटे यांचा विरोध अनेक वर्षे सातत्याने चालला. एकमेकांवर आरोप करताना मुरकुटेंकडून अनेकदा तिखट भाषा वापरली जायची. मात्र, आदिक तितक्‍याच संयमाने व शांततेने त्यांना प्रत्युत्तर देत. आदिकांच्या वक्‍तृत्वाला साहित्याची जोड असे. ते कधीही आपल्या भाषणातून जहाल भाषेचा वापर करीत नसत. फारच जहरी टीका करायची असली की ते कविता, शेरोशायरीचा आधार घेत शालजोडीतून फटकारे मारायचे. त्यांच्या याच वक्‍तृत्वशैलीमुळे अखेरपर्यंत असंख्य चाहत्यांच्या मनात ते घर करून होते.

त्यांच्याप्रमाणेच पवार, शिंदे, टेकावडे या नेत्यांनीही आपल्या भाषणातून संयमाची मर्यादा ओलांडली नाही. मुरकुटे यांनी राजकारणात नेहमीच विरोध दर्शविताना प्रखर भाषेचा वापर केला. त्यांच्या या शैलीमुळे त्यांचा आजही तालुक्‍यातील राजकारणावर दरारा दिसून येतो. प्रारंभी त्यांच्या नेतृत्वाला मानणाऱ्या ससाणे यांनी मात्र आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तोंडात नेहमी साखर ठेवली. प्रस्थापित राजकारण्यांच्या गोटातून सत्ता मिळविण्यासाठी कधी त्यांनी आदिकांचा आधार घेतला, तर कधी आदिकांच्याच विरोधात राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर सतत झाला. मात्र, ससाणे यांनी बेरजेचे राजकारण करताना कधीही संयम ढळू दिला नाही.

तालुक्‍यातील राजकारणात या सर्वांनी संघटनेच्या माध्यमातून आपापले गड मजबूत केले. एकमेकांना प्रखर विरोधही केला. मात्र, तालुक्‍याच्या विकासाच्या कामात त्यांनी कधीही पाय खेचले नाही हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच तालुक्‍यात आज जिल्ह्याच्या दृष्टीने उपयोगी पडणारे उपविभागीय परिवहन कार्यालय, एसटी कार्यशाळा, औद्योगिक वसाहत, टाकळीभान टेलटॅंक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, नगररचना कार्यालय, पुढची अनेक वर्षांचे नियोजन होणाऱ्या पाण्याचा तलाव, अद्ययावत प्रशासकीय इमारत, क्रीडासंकुल, सहकार न्यायालय, उड्डाणपूल, नाट्यगृह या गोष्टी होऊ शकल्या.

या सर्व नेत्यांच्या पुण्याईवर आता त्यांची पुढची पिढी राजकारणात पाय रोऊ पाहत आहे. गोविंदराव आदिक यांच्या कन्या अनुराधा व अविनाश, मुरकुटेंचे सुपुत्र सिद्धार्थ, स्नुषा मंजुश्री, वंदना, ससाणेंचे चिरंजीव करण, कांबळेंचे चिरंजीव संतोष या यंग जनरेशनची वाटचाल जोमात सुरू झाली असली तरी त्यांच्यापुढे आता वेगळीच आव्हाने आहेत. कारण, त्यांच्या पूर्वजांपैकी कोणाकडेही राजकीय वारसा नव्हता. केवळ संघर्ष आणि संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी मुंबईपर्यंत ओळख निर्माण केली. आज या तरुणांना संघर्ष तर करावाच लागणार आहे. मात्र, त्याचबरोबर वडिलोपार्जित संघटन टिकवून राजकीय ठसा उमटविण्यासाठी मोठी कसरत भविष्यात करावी लागणार आहे. प्रत्येक वारसदाराची “लॉंचिंग’ वडिलांनी केलेल्या कामाच्या पुण्याईवर झाली असली तरी आपली पुण्याई निर्माण करणे यासाठी त्यांना भविष्यात झटावे लागणार आहे. स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे लागणार आहे.

Jpeg

  प्रदीप आहेर 

श्रीरामपूर प्रतिनिधी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)