श्रीरामपुरात खड्ड्यांना अभिषेक, नगरसेवकाचे आंदोलन

विरोधात असल्याने प्रभाग 8 मधील रस्त्यांची कामे होत नसल्याचा नगराध्यक्ष, प्रशासनावर आरोप

श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील अनेक रस्त्यांची कामे गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी करूनही विरोधी नगरसेवक निवडून आल्याने केवळ राजकीय आकसापोटी जाणून-बुजून केली जात नाही. त्यामुळे नगराध्यक्षा व प्रशासनाला बुद्धीची देवता श्री गणेशाने सुबुद्धी द्यावी, यासाठी खड्ड्यांमध्ये नगरसेवक दिलीप नागरे यांच्या हस्ते अभिषेक करुन लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले, निवडणुकीनंतर एक दोन महिन्यांनी कामे सुरु होतील, अशी सामान्य जनतेची अपेक्षा होती. परंतु नऊ महिने उलटल्यानंतरही कोणत्याही कामांना सुरुवात झालेली नाही. हे प्रशासन व कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा या पदाची जबाबदारी झटकून केवळ राजकीय द्वेषापोटी आरोप-प्रत्यारोपात मग्न आहे. परंतु जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला असून या संदर्भात सत्ताधाऱ्यांना उत्तर द्यावे लागेल.

संबंधीत रस्त्यांमध्ये डॉक्‍टर चाटुफळे मार्ग ते जिजामाता चौक, कुंभार गल्ली ते शंकर भुवनपर्यंत, भगवान महावीर पथ ते स्टेट बॅंक चौक ते जिजामाता चौक या रस्त्यांच्या कामाची संबंधीत ठेकेदाराला एक वर्षापूर्वी वर्कऑर्डर देण्यात आल्या होत्या. केवळ आचारसंहिता लागल्याने संबंधीत काम तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले होते. परंतु निवडणुका होऊन नऊ महिने उलटले असूनही खड्ड्यांमध्ये साधा मुरुमही टाकण्यात आलेला नाही. या रस्त्यावर अनेक शाळा, बॅंका, रूग्णालये अशी महत्वाची ठिकाणे आहेत. पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावरून चालणेही मुश्‍कील होते.

या उपोषणात तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, पक्षप्रतोद संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुख्तारभाई शाह, उपनगराध्यक्ष करण ससाणे, रितेश रोटे, नगरसेविका आशाताई रासकर, मुळा-प्रवराचे संचालक संजय छल्लारे, दत्तात्रय साबळे, शशांक रासकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)