श्रीरामपुरातील “ते’ 34 कटूंबीय घरकुलांपासून वंचितच

श्रीरामपूर- दहा वर्षांपूर्वी श्रीरामपूर नगरपालिकेने क्रीडा संकुल बांधण्यासाठी अतिक्रमण काढताना 34 घरे पाडली. त्यावेळी घरकुले देण्याचे लेखी आश्‍वासन देवूनही उद्याप घरकुले न मिळाल्याने वंचितांनी येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले आहे. काही अतिक्रमण धारकांना पालिकेच्या तत्कालीन व सध्याच्या पदाधिकाऱ्यांनी पैसे घेऊन गाळे दिल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे.

तहसील कचेरी रस्त्यावरील कर्मवीर पुतळा चौकाजवळ पालिकेने क्रीडा संकुल उभारले आहे. या संकुलाचे काम सुरू करतेवेळी 2008 मध्ये तेथील अतिक्रमीत जागेवरील काही टपऱ्या व घरे काढण्यात आली होती. ज्यांची घरे पाडण्यात आली त्यांना घरकूल योजनेत सहभागी करून घेण्याचे लेखी आश्‍वासन तत्कालीन नगराध्यक्षांनी दिले होते. त्याचा पाठपुरावा करूनही घरे मिळाली नसल्याने लहूजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागूल, सचिव हनिफ पठाण यांच्या नेतृत्वाखाली 2011 साली सर्व वंचितांनी उषोषण केले होते. तेव्हाही घरकुले देण्याबाबत लेखी आश्‍वासन देण्यात आले होते.

आता दहा वर्षांनंतरही घरे पाडण्यात आलेल्यांपैकी 34 कुटुंब वंचित आहेत. दरम्यान, काही अतिक्रमण धारकांकडून पैसे घेऊन त्यांना गाळे देण्यात आल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. काल (दि.28) रोजी सुरू झालेले उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. मुख्याधिकारी सुमंत मोरे यांनी मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्या अवैध असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ज्यांना घरे व गाळे देण्यासंदर्भात सभागृहाने ठराव केला त्यांचा प्रश्‍न मिटला असून या 34 लाभार्थ्यांबाबत सभागृहाने अद्याप काहीच निर्णय घेतला नसल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, स्टेडियम परिसरात सध्या बांधण्यात येत असलेले 22 गाळे संबंधीत लाभार्थ्यांच्या मागणीनुसार पालिकेचा ठराव करून बांधण्यात येत आहेत. हे गाळे संबंधीतांनाच देण्यात येणार असल्याने त्यांचा लिलाव करण्याचा प्रश्‍नच नाही, असे स्पष्ट केले. उपोषणकर्त्यांना मागणीनुसार घरकूल योजनेत समाविष्ट करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. दरम्यान, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र गुलाटी आदींनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)