“श्रीमंत’ महापालिका होणार कर्जबाजारी

पिंपरी – आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका म्हणून ज्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपला नावलौकिक कमविला तीच महापालिका आता भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकालावधीत कर्जबाजारी होणार आहे. नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे कोटी रुपये कर्ज रोख्यांतून उभारण्याचे नियोजन अंदाजपत्रकात करण्यात आल्याने पालिकेकडे पैशांची चणचण भासत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. महापालिकेच्या निर्मितीनंतर जकातीच्या उत्पन्नाने नव-नवे उच्चांक केल्यामुळे या महापालिकेची गणना आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत महापालिकांमध्ये होत राहिली. सुरुवातीला महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कॉंग्रेसच्या हाती होत्या नंतर त्या राष्ट्रवादीच्या हाती गेल्या तर दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या हाती गेल्या. मागील काळात जकातीचे उत्पन्न, केंद्र आणि राज्य शासनाकडून मिळणाऱ्या निधीमुळे महापालिकेच्या तिजोरीला कधीच पैशांची चणचण भासली नाही. अथवा कर्ज उभारण्याची गरजही निर्माण झाली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुरुवातीला “क’ वर्गात असलेली ही महापालिका सध्या “ब’ वर्गात परावर्तीत झाली आहे. राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत आल्यानंतर तिजोरीतील पैशांचा खर्च मोठ्या प्रमाणात सुरू झाला. महापालिकेच्या ठेवी मोडल्या गेल्या. तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांनी शहरातील स्थानिक नेतेमंडळी व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामध्ये समन्वय साधत मोठी विकास कामे हाती घेतली. त्यातच राज्यात आणि केंद्रात कॉंग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असल्याने जेएनएनयुआरएमचा निधीही मोठ्या प्रमाणात महापालिकेला मिळाला. केंद्र आणि राज्याचा निधी त्याचबरोबर जकातीचे उत्पन्न यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षी वाढतच गेले. मात्र अचानकपणे केंद्रात आणि राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर जकात जावून आलेल्या स्थानिक संस्था करामुळे (एलबीटी) पहिल्यांदा महापालिकेच्या अंदाजपत्रकाला धक्का बसला. जकातीच्या तुलनेत एलबीटीचे उत्पन्न कमी मिळू लागल्याने नाशिक फाटा उड्डाणपुलासाठी महापालिकेने जागतिक बॅंकेकडून पहिल्यांदा कर्ज घेतले. यानंतर काही दिवसांत एक देश एक कर ही प्रणाली लागू झाल्यामुळे एलबीटी रद्द झाला.

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेली जकात किंवा एलबीटी बंद झाल्याने पुर्णत: महापालिकेला केंद्राकडून अथवा राज्याकडून येणाऱ्या निधीवर अवलंबून रहावे लागण्यास सुरुवात झाली. करोडो रुपयांची हाती घेतलेली काही जेएनएनयुआरएम ऐवजी केंद्राने स्मार्ट सिटीचा प्रकल्प आणून त्यामध्येही निधीची कपात केल्यामुळे महापालिकेला आर्थिक टंचाईचा काही प्रमाणात सामना करावा लागण्यास सुरुवात झाली. आता नव्या अंदाजपत्रकात नदी सुधार प्रकल्पासाठी थेट कर्जरोखे उभारण्याचा घेतलेला निर्णय हा आशिया खंडातील श्रीमंत असे बिरुद मिरविणाऱ्या महापालिकेला खऱ्या अर्थाने धक्का असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

महापालिकेने गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातून वाहणाऱ्या साबरमती नदी सुधारच्या धर्तीवर पवना व इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा नदीसुधार प्रकल्प तयार करून राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 455 कोटी व दुसऱ्या टप्प्यात 245 कोटी 96 लाख असा एकूण 700 कोटी 96 लाख खर्च अपेक्षित होता. सुमारे 343 कोटी रुपयांच्या तरतुदीचा सुधारीत प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडेही पाठविला. दरम्यान, केंद्र सरकारने पुणे महापालिकेचा नदी सुधार प्रकल्पात समावेश केला. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या. केंद्र, राज्य आणि महापालिकेतही भाजपचेच सरकार असताना नदी सुधारमध्ये पवना व इंद्रायणीचा समावेश न झाल्याने महापलिकेला कर्जरोखे उभारण्याची वेळ आली आहे.

कोटींची उड्डाणे अन्‌ भ्रष्ट कारभार
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवित सत्तेत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीच्याच पावलावर पाऊल ठेवणे पसंद केले. ठेकेदारांची रिंग, त्यातून होणारा भ्रष्टाचार, वाढीव रक्कमेच्या निविदा भरण्याची पद्धत आणि प्रशासन, ठेकेदार आणि सत्ताधारी असे जमलेले त्रिकुट हे देखील महापालिकेला श्रीमंतीकडून कर्जबाजारी करण्यास कारणीभूत ठरणार आहे.

पत ठरविणार कर्जरोख्यांचे भवितव्य
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक पत ही सक्षम आहे. या सक्षमतेवरच महापालिका प्रशासनाने शासनाकडून कर्जरोखे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांकडून कर्ज घेण्याऐवजी कर्जरोख्यातून येणारा निधी नेहमी परवडणारा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र गेल्या 15 वर्षांत शिल्लकीतून कर्जबाजारीपणाकडे जाणाऱ्या महापालिकेची पत शासन काय ठरविणार यावरच कर्जरोख्यांचे भवितव्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)