श्रीमंत महापालिका अन गरीब पोलीस आयुक्‍तालय

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्‍तालय सुरु होऊन तीन महिने होत आले, तरीही आयुक्‍तालयाला अद्याप पुरेसे मनुष्यबळ व वाहने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे आशिया खंडात श्रीमंत असलेल्या महापालिका हद्दीतील गरीब पोलीस आयुक्‍तालय, अशी खंत पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी व्यक्‍त केली.

आयुक्‍त पद्‌मनाभन यांनी मंगळवारी (दि.30) पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेत आपली खंत व्यक्‍त केली. पत्रकारांनी आयुक्तांना आयुक्तालयाच्या सध्यस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, मनुष्यबळ व गाड्या यांची स्थिती जैसे थे असून उलट पुणे आयुक्तालयाने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला दिलेले मनुष्यबळ हे अतिरिक्‍त झाले असून, ते परत मागवले आहे. दिलेले अपुरे मनुष्यबळ कायम ठेवण्यासाठीसुद्धा आम्ही झगडत आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिखली पोलीस ठाण्याच्या उद्‌घाटन प्रसंगी अपर आयुक्त मकरंद रानडे यांनी आयुक्तालयाची परिस्थिती व मागणी असा पूर्ण लेखाजोखा मांडला होता. लवकरात लवकर आम्हाला योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी केली होती. मात्र, ती मागणी कार्यक्रमापूर्ती राहिली असून, आजही आयुक्‍तालयाला गाडी व मनुष्यबळासाठी झगडावे लागत आहे.

पद्‌मनाभन म्हणाले की, आमच्याकडे आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकूण 300 अर्ज आले असून, आम्ही त्या सर्वांना मंजुरी देत आहोत. गाड्या आम्ही गरजेनुसार वापरत आहोत. दिवाळी आली तरी अद्याप आयुक्तालयात जे लोक सरळ नियुक्त झाले आहेत. त्याचे अद्याप पगार झालेले नाही. त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे काम सुरु असून, केवळ पुणे आयुक्‍तालयाकडून वर्ग झालेल्या कर्मचाऱ्यांचे पगार होत आहेत.
शहरातील गुन्हेगारी बद्दलही बोलताना आयुक्त म्हणाले की, शहरात गुन्हेगारी आहे मात्र त्याहीपेक्षा त्याकडे केले जाणारे दुर्लक्ष ही गंभीर बाब आहे. आज “पोलीस आपल्या दारी’ या उपक्रमात एका पोलीस कर्मचाऱ्याला किमान चार तास हद्दीमध्ये फिरून गस्त घालणे, तक्रारी घेणे, त्या सोडवणे अशी कामे करावी लागत आहेत. याचा परिणामही येत्या तीन महिन्यांत सर्वांना दिसेल. पोलीस शहरात फिरायला लागला, गुन्हे केवळ दाखल करुन न घेता त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले, तर गुन्हेगारी आवाक्‍यात येण्यासारखी आहे. यात पोलिसांचीही दमछाक होत नाही. तक्रार पेटीलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागरिक विशेषतः विद्यार्थीनी याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तक्रारी येतील तशा दाखल करुन घेणे त्यावर कारवाई करणे हा आमचा अजेंडा आहे, असेही आयुक्‍त यावेळी म्हणाले.

पोलीस आयुक्तालयाच्या भिंती उभारल्या असल्या, तरी आयुक्तालयाला राजीकय अनास्थेचा फटका बसत असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पुण्याचे उपनगर म्हणून नाही, तर स्वतंत्र महापालिका व पोलीस आयुक्तालय म्हणून याकडे पाहिले तरच शहरातील प्रश्‍न सुटू शकरणार आहेत.
– आर. के. पद्मनाभन, पोलीस आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)