श्रीमंतीसाठी नाकाचा शोध!

श्रीमंत व्हायचंय? असं सहज जरी कुणी म्हणालं तरी सभोवतालच्या लोकांचे कान टवकारले जातात. श्रीमंत होण्यासाठी काय-काय केलं जातं, याची यादी बुलेट ट्रेनपेक्षाही लांब होईल ! यासाठी कृतिशील प्रयत्नांपेक्षा सहजसोप्या क्‍लृप्त्यांचा शोध जास्त घेतला जातो आणि तो अमलात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. कुणी खिशात विशिष्ट आकडा असलेले कॉईन ठेवतो, तर कुणी पाकिटात एखादे यंत्र ! हे केवळ भारतातच घडते असे नाही बरं का ! पुढारलेले किंवा प्रगत म्हणवणारे देशही याबाबत पुढारलेलेच आहेत.

‘विकसित’ म्हणून मिरवणाऱ्या अनेक देशांमधील लोकही अत्यंत हास्यास्पद अशा अंधश्रद्धांच्या विळख्यात अडकलेले अनेक वेळा दिसून येते. लंडनमधील “नाक शोधा’ हे प्रकरणही असेच आहे. तिथे सोहो परिसरात वेगवेगळ्या ठिकाणच्या भिंतींवर नाकाच्या सात प्रतिकृती बसवलेल्या आहेत. त्यांना “सेव्हन नोजेस ऑफ सोहो’ असे म्हटले जाते. लंडनमध्ये पायी फिरणाऱ्या पर्यटकांसाठी ते एक रहस्यमय आकर्षण आहे. नाकाच्या या सातही प्रतिकृती जे शोधून काढतात ते श्रीमंत होतात, असा तिकडे (गैर) समज आहे!

डेव्हीड बकली नावाच्या एका आर्टिस्टने ही नाकं बनवून लावली होती. 1977 मध्ये ब्रिटिश सरकारने नागरिकांची निगराणी करण्यासाठी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे ठरवले होते. डेव्हीडला ही कल्पना आवडली नाही. त्याला वाटत होते की, नागरिकांच्या खासगी जीवनात नाक खुपसण्याचा हा सरकारचा इरादा आहे. त्यामुळे या योजनेला विरोध करण्यासाठी त्याने कलात्मक मार्ग अवलंबला. त्याने प्लास्टर ऑफ पॅरिसपासून नाकाच्या 35 प्रतिकृती बनवल्या आणि लंडनच्या सोहो परिसरातील वेगवेगळ्या इमारतींच्या भिंतींवर चिकटवून दिल्या.

कालांतराने बहुतांश नाकं ‘कापली’ गेली; पण सात नाकं अजूनही शाबूत आहेत. त्यांच्याबाबत वेगवेगळ्या दंतकथा प्रचलित झाल्या आणि आता त्या लंडन पाहणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण बनल्या आहेत!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)