श्रीगोंद्यात वाळूतस्करी सर्रास सुरूच!

महसूलचे पुर्णतः दुर्लक्ष ; पोलीस कारवाईचा परिणाम नाही

श्रीगोंदा – तालुक्‍यातील अवैध वाळूतस्करीची जिल्हाभर चर्चा रंगत आहे. अवैध वाळूतस्करी रोखण्याची जबाबदारी असणाऱ्या महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. महसूल अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर दहा दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस प्रशासनाने अवैध वाळूतस्करी विरोधात मोठी कारवाई केली. त्यानंतर देखील तालुक्‍यात अवैध वाळूतस्करी सुरूच आहे. अवैध वाळूतस्करांसमोर महसूल आणि पोलीस प्रशासन अक्षरशः हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे.
तालुक्‍यातील घोड, भीमा, सीना, हंगा नद्यांसह गावागावात ओढ्या-नाल्यांतून खुलेआम शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. तालुक्‍यातील राजापूर, माट, दाणेवाडी, गव्हाणेवाडी, बेलवंडी बुद्रुक, सांगवी दुमाला, गार, कौठा, आर्वी -अनगरे, पेडगाव, अजनुज, निमगाव खलू, काष्टी, वांगदरी, आढळगाव, टाकळी, हिरडगाव, चवर सांगवी आदी गावांत दिवसाढवळ्या शेकडो ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा सुरू आहे. महसूल प्रशासन वाळूतस्करीकडे सोयीस्करपणे डोळेझाक करीत असल्याने तस्करांचे चांगलेच फावते आहे. महसूल, पोलीस आणि वन विभाग वाळूतस्करीकडे कानाडोळा करीत असल्याने दिवसेंदिवस वाळूतस्करांची मुजोरी वाढत चालली आहे. त्यातूनच मागच्या महिन्यात प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा गंभीर प्रकार बनपिंप्री शिवारात घडला.या हल्ल्यात प्रांताधिकारी दानेज यांच्यावर थेट कुऱ्हाडीने वार करण्यापर्यंत तस्करांची मजल गेली.
प्रांताधिकारी गोविंद दानेज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर वाळूतस्करी विरोधात धडक मोही सुरू करण्याऐवजी महसूल अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत असल्याची सबब देत अवैध वाळूतस्करी करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई न करण्याची भूमिका महसूल प्रशासनाने जाहीर केली. महसूल प्रशासनाने वाळूतस्करी विरोधी कारवाईतून हात झटकल्यानंतर पोलीस प्रशासनातील अप्पर पोलीस अधीक्षक जयंतकुमार मीना यांनी सांगवी दुमाला येथील भीमा नदी पात्रात धडक कारवाई करीत जवळपास पावणेदोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला. या धडक कारवाईनंतर अवैध वाळूतस्करीला काहीसा “चाप’ बसेल अशी अपेक्षा होती, घडले मात्र उलटेच. अप्पर पोलीस अधीक्षकांनी अवैध वाळूतस्करी विरोधात सुरू केलेली मोहीम तालुक्‍यातील दोन्ही पोलीस ठाण्यांनी पुढे चालवली असती तरी वाळूतस्करांचे धाबे दणाणले असते. मात्र तालुक्‍यातील पोलीस प्रशासनाने देखील वाळूतस्करी विरोधी कारवाईत फारसा “इंटरेस्ट’ घेतला नाही.
महसूल अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांनी वाळूतस्करी विरोधात मोठी कारवाई केली, मात्र तरीही तालुक्‍यातील वाळूतस्करांवर याचा थोडाही परिणाम झाला नाही. आजही तालुक्‍यातील राजपुर, माट, दाणेवाडी, गार भागांत दिवसाढवळ्या यांत्रिक बोटींच्या सहाय्याने खुलेआम वाळू उपसा केला जात आहे. तालुक्‍यातील अवैध वाळूतस्करीमुळे प्रशासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहेच, शिवाय दिवसेंदिवस वाळूतस्करांची मुजोरी वाढतच चालल्याने त्याचा त्रास गावागावात सामान्यांना होऊ लागला आहे. तालुक्‍यातील वाळूतस्करी रोखण्यात श्रीगोंदा महसूल आणि पोलीस प्रशासनाला अपयश आल्याने जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वाळूतस्करी विरोधात कारवाई करण्याची गरज आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)