श्रीगोंद्यात माजी मंत्री पाचपुते गटाला खिंडार

भोस आणि पोटेंच्या आघाडी प्रवेशाने पालिका निवडणुकीची समीकरणे बदलणार

समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा: श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या तुलनेत दुबळ्या वाटणाऱ्या कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीने माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाला मोठे खिंडार पाडले आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नगराध्यक्ष मनोहर पोटे, नगरसेवक सतीश मखरे आणि नगरसेवक गणेश भोस यांच्या आघाडीतील प्रवेशाने नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठीची समिकरणे बदलणार आहेत. भोस आणि पोटे यांनी समर्थकांसह पाचपुते गटाला सोडचिठ्ठी देत कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केल्याने पाचपुतेंना जोरदार धक्का बसला आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठे बळ मिळाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

27 जानेवारी रोजी श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून होणार असल्याने नगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी पाचपुते गटाकडे इच्छुकांची भाऊगर्दी होती. यामुळे नगरपालिका निवडणुकीत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्या गटाचे पारडे जड मानले जात होते. मात्र, त्याचवेळी इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराजांची मनधरणी करण्याचे आव्हान देखील पाचपुतेंसमोर असेल, असे मत जाणकार व्यक्‍त करीत होते. इच्छुकांच्या नाराजीचा फटका टाळण्यासाठी पाचपुते गटाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार अंतिम क्षणी जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाचपुते गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरला असल्याची उघड चर्चा शहरात रंगू लागल्याने पाचपुते गटातील नाराज आघाडीच्या गळाला लागण्याची शक्‍यता होती.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पाचपुते जातीय समिकरणाला महत्त्व देत असल्याची चर्चा सुरू झाली होती. श्रीगोंदा शहरात माळी समाजाचे साडेआठ हजार मतदान आहे, यामुळे पाचपुते गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी माळी समाजातील इच्छुकालाच मिळेल असे आडाखे बांधले जात आहेत. त्यातच एका उमेदवाराने खर्चाबाबत हात मोकळे सोडल्याने पाचपुतेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरल्याच्या चर्चेला खतपाणी मिळाले. याच गोष्टीने विचलित झालेल्या नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी भोस यांच्याबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा वानवा होती.

सोमवारी (दि.31) सकाळी आमदार राहुल जगताप, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच बाबासाहेब भोस आणि मनोहर पोटे समर्थकांसह तेथे दाखल झाले. याच पत्रकार परिषदेत भोस आणि पोटे यांनी समर्थकांसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश केला. एवढेच नव्हे तर नगराध्यक्षपदासाठी आघाडीच्या वतीने शुभांगी मनोहर पोटे ह्या कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, हे देखील जाहीर करण्यात आले. भोस, पोटे आणि समर्थकांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत प्रवेश घडवून आणण्यासाठी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मुख्य भूमिका बजावल्याचे समजते. आज (सोमवारी) प्रवेश होण्यापूर्वी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि जेष्ठ नेते बाबासाहेब भोस यांच्यात आठवडाभर बैठकांचे खलबते झाल्याचीही चर्चा होती.

भोस आणि पोटे यांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील प्रवेश आणि शुभांगी मनोहर पोटे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर झाल्याने नगरपालिका निवडणुकीतील अनेक राजकीय समिकरणे काही क्षणात बदलली आहेत. आघाडीने नगराध्यक्षपदासाठी पोटेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आघाडीतील इच्छुक असलेल्या अर्चना गोरे नाराज झाल्या असल्या तरी गोरेंनी “वेट अँड वॉच’ची भूमिका घेतल्याचे समजते. नगराध्यक्ष मनोहर पोटे यांच्यासह नगरसेवक सतीश मखरे आणि नगरसेवक गणेश भोस यांनी देखील आघाडीत प्रवेश केला. त्याचवेळी भोस समर्थक म्हणून ओळखले जाणारे तीन नगरसेवक अद्याप पाचपुते गटात आहेत. पाचपुते “त्या’ तिघांना थोपविण्यात यशस्वी होतात की ते तिघे देखील आघाडीची वाट धरतात. हे पाहणे नगरपालिकेच्या आगामी समिकरणांच्या दृष्टीने महत्वाचे असेल. पाचपुते गटातून येणाऱ्यांमुळे आघाडीतील काहींच्या उमेदवारीला “कात्री’ लागण्याचे संकेत आहेत. यामुळे नगरसेवकपदाच्या उमेदवारांची पळवापळवी पहायला मिळू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)