श्रीगोंद्यात ऑनलाईन जमीन घोटाळा

तहसीलदारांची येळपण्याच्या तलाठ्याला नोटीस; चौकशीनंतर उजेड
श्रीगोंदे – तालुक्‍यातील येळपणे शिवारातील गट क्रमांक 88/35 व 88/39 वर्ग 2 च्या जमिनीचे कोणतेही व्यवहार न होताच ही जमीन पाच व्यक्तींच्या नावे हस्तांतर करण्याची किमया तलाठ्याने करून दाखविली. जे नसे ललाठी, ते करी तलाठी असे म्हणतात. या तलाठ्याने संबंधित पाच व्यक्तींच्या नावे ऑनलाईन सात बारा तयार करून दिला. हा ऑनलाईन जमीन घोटाळा असून या प्रकरणी चौकशी कर्याचे तसेच खुलासा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
लोणी व्यंकनाथ येथील बबन कचरू लहाने (1 हेक्‍टर 80 आर) सुनीता संभाजी खेतमाळीस (1 हेक्‍टर 60 आर), सुवर्णा तुकाराम साळवे (1 हेक्‍टर 60 आर) यांना खरेदीने दिल्याचे दाखविण्यात आले. मात्र हा फेर क्रमांक 3237 पारूबाई मांगडे यांच्या घरकुल संमतीपत्राचा आहे. तहसील कार्यालयातील मूळ अभिलेख पाहिले असता चंद्रकांत शिंदी यांनी तो आपल्या बहिणीला दिला होता. याचा अर्थ खोट्‌या व अवास्तव नोंदी तलाठी अतुल धांडे यांनी केल्या. तसेच गट क्रमांक 88/ 39 मधील खातेदारांची बाबासाहेब सर्जेराव कुंदाडे (1 हेक्‍टर 50 आर), अविनाश छगन पांढरे (1 हेक्‍टर 50 आर) ही नावे फेर क्रमांक 3287 मध्ये दाखल झाल्याचे दिसते. ही जमीन रंजना उदमले व अजित गद्रे यांच्या नावावरून कुंदाडे व पांढरे यांच्या नावावर हस्तांतर केली आहे. मात्र तहसील कार्यालयातील कागदपत्रे तपासली असता हा फेर गणपत गायकवाड यांच्या इकरार पत्राचा असल्याचे निदर्शनास आले आहे. घोड धरणासाठी अधिग्रहण केलेल्या जमिनी त्यानंतर कामगार तलाठ्यांना हाताशी धरून मूळ मालकांच्या नावावर केल्या.
या दोन्ही नकला चुकीच्या व अवास्तव असल्याचे तहसीलदार महेंद्र महाजन यांनी येळपणे पिसोरेचे कामगार तलाठी अतुल धांडे यांना पाठविलेल्या नोटिशीत म्हटले आहे. 24 तासांच्या आत खुलासा करण्यास त्यांनी बजावले आहे. त्याअगोदर या प्रकरणाची चिंभळ्याच्या मंडलाधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. या नोटीसमध्ये नमूद केले आहे, की ऑनलाईन कामकाजाबाबत कोणतेही अधिकार नसताना 88/32, 88/35 या गटांमधील नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत. याबाबत खुलासा न केल्यास सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांना पाठविण्यात येईल, असा इशारा तहसीलदारांनी दिला आहे. यापूर्वी या गटातील जमीन हस्तांतर प्रक्रियेत तत्कालीन कामगार तलाठ्यांनी मोठा घोटाळा केला होता. येळपणे येथे सुमारे 200 एकर जमिनीचा घोटाळा उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. लोणी व्यंकनाथचे राजेंद्र झुंबर काकडे यांनी या संदर्भात 19 मे रोजी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महाजन यांनी मंडलाधिकारी टमक यांच्यामार्फत चौकशी करून धांडे यांच्याकडे खुलासा मागितला आहे.

बोगस जमिनीवर बोगस कर्ज

या जमिनीवर बबन लहाने, सुनीता खेतमाळीस, सुवर्णा साळवे, अविनाश पांढरे, बाबासाहेब कुंदाडे यांना लोणी व्यंकनाथ सोसायटीने सुमारे सहा लाखाचे कर्ज वाटप केले आहे. हे कर्ज देताना जिल्हा बॅंकेचीही फसवणूक करण्यात आली आहे.
—–

24 तासांचा अल्टिमेटम

“येळपणेचे कामगार तलाठी अतुल धांडे यांना नोटीस बजावली आहे. त्यांना 24 तासांत खुलासा करण्यास सांगितले आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
– महेंद्र महाजन, तहसीलदार, श्रीगोंदे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)