श्रीगोंद्यातील सेतू केंद्रांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे उपोषण

सामान्यांची लूट होत असल्याचा आरोप : दाखल्यांचा कालावधी, शुल्क माहितीचे बोर्ड लावण्याची मागणी

श्रीगोंदा – तालुक्‍यातील महा-ई सेतू केंद्रांमधून विद्यार्थ्यांची व सामान्य जनतेची लूट होत आहे, असे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजय खेतमाळीस यांनी तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार सोमवारी आमदार राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने उपोषण करण्यात आले.

तहसीलदार गायकवाड यांच्या मध्यस्थीने तातडीने श्रीगोंदा तालुक्‍यातील सर्व सेतूचालकांची व राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष विशाल लगड व उपाध्यक्ष विजय खेतमाळीस यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. यामध्ये तालुक्‍यातील सेतुमधील सर्व प्रकारचे दाखले शासकीय नियमानुसार मिळावेत, तसेच सर्व दाखल्यांच्या पावत्या मिळाव्यात, सर्व दाखल्यांसाठीचे लागणारे शुल्क व कालावधी याचा बोर्ड प्रत्येक सेतू केंद्रात लावण्यात यावा, आदी मागण्या राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आल्या होत्या. त्यासाठी उपाध्यक्ष विजय खेतमाळीस यांनी प्रयत्न केले. त्यानुसार नायब तहसीलदार यांनी सेतूचालकांना दाखल्यांच्या पावत्या देण्यात याव्यात, तसेच त्यासाठीचे शुल्क व कालावधीचा बोर्ड सर्व सेतू केंद्रात लावावा, असा आदेश दिला होता. या दाखल्यांसाठीच्या लागणाऱ्या शुल्काची तीन दिवसात अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्‍वासन नायब तहसीलदार यांनी दिले. मात्र, तीन दिवसात अंमलबजावणी झाली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस पुन्हा आंदोलन छेडेल, असा इशारा तालुकाध्यक्ष विशाल लगड यांनी दिला.

यावेळी आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड, सागर वाकडे, राजाभाऊ लोखंडे, सावता हिरवे, राजेंद्र काकडे, अमोल कोहक, गोरख उंडे, नीलेश गोरे, सोहम जगताप, सोमनाथ डुबल, निखिल नितनवरे, बाळकृष्ण शिरसाठ, रवींद्र औटी, ऋषिकेश वाळके, गणेश खेतमाळीस, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)