श्रीगोंद्यातील कोट्यवधींच्या विकास कामांना मंजुरी 

नगरपालिका सर्वसाधारण सभा : नाना-नानी पार्कसाठी 6 कोटी खर्च होणार
श्रीगोंदे – श्रीगोंदे नगरपालिकेच्या गुुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यात लेंडीनाला पर्यावरण संवर्धन व नाना-नानी पार्कसाठी सुमारे 6 कोटींच्या कामाला अंतिम मान्यता देण्यात आली. महात्मा फुले उद्यानशेजारी 1 कोटी 6 लाख रुपये खर्चून खेळाचे मैदान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना दिली.
पालिका सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी मनोहर पोटे होते. उपनगराध्यक्ष अर्चना राजू गोरे, नगरसेवक नानासाहेब कोथिंबिरे, अशोक खेंडके, सुनीता शिंदे, छाया गोरे, अख्तर शेख, दादा औटी, संगीता मखरे, सुनील वाळके, वैशाली आळेकर, संगीता खेतमाळीस, गणेश भोस आदी नगरसेवकांनी चर्चेत भाग घेऊन कामांमध्ये दुरुस्त्या सूचविल्या. प्रशासकीय बाबींसंदर्भात मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी उत्तरे दिली. शहरासाठी आलेला कोट्यवधींचा निधी दर्जेदार कामांद्वारे वापरण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष पोटे यांनी या वेळी दिली.
शहराच्या विकासात मोलाची भर घालणाऱ्या लेंडीनाला सरोवर विकास योजनेत सुमारे 6 कोटी रुपये खर्चून नाना-नानी पार्क उभारण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. यापूर्वी दोनदा जाहीर झालेल्या ई-निविदांना प्रतिसाद मिळत नव्हता. आता दोनच निविदा आल्या; पैकी एक निविदा सदोष होती. सबब सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्सची निविदा मंजूर करण्यात आली. महात्मा फुले उद्यान व स्टडी सर्कल शेजारी आरक्षण क्र. 6 वर खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी एक कोटी सहा लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. या दोन्ही कामास लवकरच सुरुवात होणार असल्याचेही पोटे यांनी सांगितले.

इकोसेन्सेटिव्हची हद्द कमी करा…
श्रीगोंदे नगरपालिका हद्दीत माळढोक अभयारण्यासाठी राखीव वनक्षेत्र आहे. या क्षेत्राभोवतीचा परिसर इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येतो. वनविभागाने याची हद्द कमी करून ती फक्त 100 मीटर ठेवावी, अशी मागणी नगरपालिकेने केली आहे. या मागणीबाबतचा निर्णय आता वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असेल. इको सेन्सेटिव्हची हद्द कमी न केल्यास खासगी जमीनधारकांसह विकास कामांना खोडा बसण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

मंजुरी मिळालेली कामे अशी…
सर्वसाधारण सभेत वरील कामाव्यतिरिक्त इतर महत्त्वाच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली. कामाचे नाव व अंदाजपत्रकीय रक्‍कम पुढीलप्रमाणे : विशेष रस्त्यांसाठी – 2 कोटी रुपये, जामखेड रोड ते हिरडेवस्ती खडीकरण व डांबरीकरण – 19 लाख रुपये, शिक्षक कॉलनी येथे मुरुमीकरण-11 लाख रुपये, नगरपरिषद हद्दीत झाडे लावून 1 वर्ष देखभाल करणे -22 लाख रुपये, साईनगर खुल्या जागेत कुंपण भिंत बांधणे- 7 लाख रुपये, सिद्धेश्वर मंदिर येथे सिद्धघाट सुशोभीकरण – 27 लाख रुपये, संत नामदेव महाराज मंदिर रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवणे – 8 लाख रुपये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)