श्रीगोंदेकरांची उत्सुकता शिगेला

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे लागले लक्ष
श्रीगोंदा, दि. 20 (प्रतिनिधी) – जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या अनुराधा नागवडे यांचे नाव आघाडीवर आहे. अध्यक्षपदाची माळ नागवडेंच्या गळ्यात पडण्याची दाट शक्‍यता असल्याने श्रीगोंदेकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अनुराधा नागवडे यांच्या रूपाने तालुक्‍याला ‘लालदिवा’ मिळण्याची आशा लागल्याने आज (दि. 21) होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे श्रीगोंद्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्ह्यात कॉंग्रेसचे सर्वाधिक 24 जागांवर उमेदवार विजयी झाले. कॉंग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे राहणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी विखे गटाकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे आणि माजी मंत्री थोरात गटाकडून राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या स्नुषा अनुराधा नागवडे ही दोन नावे आघाडीवर आहेत.
जिल्ह्यातील विखे-थोरात वादाशी सर्व परिचित आहेत. अध्यक्षपदासाठी विखे आणि थोरात गटांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद थोरात गटाला मिळाल्यास अनुराधा नागवडे यांची निवड निश्‍चित आहे. अनुराधा नागवडे यांच्या रूपाने तालुक्‍याला ‘लालदिवा’ मिळण्याची आशा असल्याने नागवडे समर्थकांसह सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीकडे तालुक्‍यातील सामान्य जनतेनेही लक्ष लागून राहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)