श्रीगोंदा नगरपरिषद निवडणूक रणसंग्राम: औटींच्या कुरुक्षेत्रात भाऊबंदकीमुळे राजकीय खडाखडी रंगणार ! 

अर्शद आ. शेख 

श्रीगोंदे: श्रीगोंद्याचे शेवटचे सरपंच दिवंगत बजरंग औटी यांचा बालेकिल्ला असणारा हा परिसर आता औटी विरुद्ध औटी या पारंपरिक लढतीसाठी प्रसिद्ध झाला आहे. पूर्व भागातील औटीवाडी प्रभागात नगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. आ. राहुल जगताप गटाचे शहरातील बिनीचे शिलेदार नगरसेवक दादा औटी यांना आरक्षणाचा फटका बसल्याने त्यांच्या पत्नी मैदानात उतरणार आहे. त्यांना भाऊबंदकीचा सामना करावा लागेल. औटीवाडीतील पारंपरिक लढत व अनुसूचित जातीतील आरक्षण यात मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

औटीवाडी प्रभागात औटी आडनावाची संख्या जास्त आहे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत औटी विरुद्ध औटी हा सामना रंगतो. अगदी नगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी देखील येथील लढत लक्षवेधी ठरत असे. दिवंगत बजरंग औटी प्रदीर्घकाल ग्रामपंचायत सदस्य होते. नंतर ते सरपंच झाले. सुमारे अकरा वर्षे ते या पदावर होते. त्यांना हटविणे विरोधकांना शक्‍य न झाल्याने थेट ग्रामपंचायतच बरखास्त करण्याची मोहीम राबविली गेली. पुढे त्याचे रूपांतर नगरपालिकेत झाले. औटींच्या राजकीय कुरघोडीतून श्रीगोंदयला नगरपालिका लादण्यात आली.

पुढे या वॉर्डाने दरवेळेस भाकरी फिरवत नव्या चेहऱ्याना संधी दिली आहे. जयराम शेळके हे पहिल्यांदा नगरसेवक झाले. औटी कुटुंबियांसाठी हा धक्का होता. पुढे याचा वचपा त्यांनी काढला. अनिता औटी यांनी चुरशीची लढत जिंकून औटींचे राजकारण पुन्हा जिवंत केले. 2009 च्या निवडणुकीत भाऊसाहेब औटी (पाचपुते गट) विरुद्ध रामभाऊ औटी (कॉंग्रेस) यांच्यात लढत झाली. भाऊसाहेब औटी यांना मतदारांनी संधी देत 82 मतांनी विजयी केले. तर 2014 साली पाचपुते गटाने पुन्हा भाऊसाहेब औटी यांना मैदानात उतरविले. कॉंग्रेसच्या दादासाहेब औटी यांनी मोठे आवाहन उभे करत 426 मतांनी भाऊ औटी यांचा पराभव केला.

2014 पासून दादा औटी या प्रभागाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या पत्नी अनिता या आधी 2004 ला नगरसेविका होत्या. या प्रभागातील दांडगा जनसंपर्क व विकास कामांसाठी आक्रमक भूमिका त्यांची जमेची बाजू आहे. सर्वसाधारण महिलेच्या आरक्षणानेमुळे अनिता दादासाहेब औटी या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पुन्हा मैदानात उतरणार आहे.पाचपुते गटाची धुरा सांभाळणारे भाऊ औटी मात्र निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. भाजपकडून दिपाली अंबादास औटी व रेखा अनिल औटी यांची नावे आघाडीवर आहे. त्यामुळे सर्वसाधारण महिलेच्या जागेवर औटी विरुद्ध औटी ही पारंपरिक लढत रंगतदार होणार हे नक्की.

याच प्रभागातील दुसरी जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने इतर वर्गातील उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे.या प्रभागात भाजपतर्फे डॉ. अनिल घोडके व संग्राम घोडके हे इच्छुक असून त्यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या जागेवर इच्छुकांच्या भाऊगर्दीचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी घेऊ शकते. ज्येष्ठ नेते नंदकुमार ताडे देखील येथून चाचपणी करीत आहेत.औटी खालोखाल येथे तुपे आडनावाचे मतदार खूप आहेत. स्थानिक उमेदवाराच्या मुद्‌द्‌यावर तुपे कुटुंबातून अंकुश तुपे मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. श्रीगोंदा शहराचे राजकारण चालविणारांचा हा वॉर्ड म्हणूनच कुरुक्षेत्र मैदान गाजविणार यात शंका नाही.

हे आहेत औटीवाडी प्रभागातून इच्छुक 

भाजपकडून दिपाली अंबादास औटी, रेखा अनिल औटी, ताईबाई नानासाहेब औटी, संग्राम घोडके, डॉ.अनिल घोडके इच्छुक आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सर्वसाधारण महिला जागेवर अनिता दादासाहेब औटी हे एकमेव प्रबळ दावेदार आहेत. प्रियंका प्रदीप औटी, दिलीप लबडे, अनिल हिरडे, सतीश लोखंडे हे देखील या प्रभागात चाचपणी करीत आहेत.

 प्रभागाची व्याप्ती 

औटीवाडी प्रभागात तुपेवस्ती, औटीवाडी, सप्रेवाडी, खेतमाळीस मळा, कुदळे मळा, दांडेकर मळा, म्हेत्रे वस्ती, बालाजी नगर या परिसराचा समावेश आहे. अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला असे दोन जागांचे येथे आरक्षण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)