श्रीगोंदा तालुक्‍यात एकाची आत्महत्या; एकीचा आडात पडून मृत्यू

श्रीगोंदा – तालुक्‍यातील श्रीगोंदा रेल्वेस्थानकाजवळ सकाळी एक मृतदेह सापडला. त्यानंतर काही काळातच तालुक्‍यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी एका मुलीचा मृतदेह आडात आढळून आला आहे. मात्र, एकाच दिवसात तालुक्‍यात दोन मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

श्रीगोंदा तालुक्‍यातील श्रीगोंदा रेल्वेस्थानकाजवळ सकाळी 11 च्या सुमारास रेल्वेखाली चिरडून सीताराम पोपट खेतमाळीस (वय 29, रा. दत्तवाडी, श्रीगोंदा) हे ठार झाल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला त्या मृतदेहाची ओळख पटणे अशक्‍य झाले होते. मात्र, काही वेळानंतर त्या मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह श्रीगोंदा शहरातील सीताराम पोपट खेतमाळीस यांचा आहे अशी नातेवाईकांनी माहिती दिल्यावर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आणले होते. सायंकाळी 5 च्या सुमारास त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

ही घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच श्रीगोंदा तालुक्‍यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी आडात एका मुलीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी आपल्या फौजफाट्यासह पारगाव सुद्रिक या ठिकाणी धाव घेतली आणि आडातून त्या मृत मुलीचा मृतदेह बाहेर काढला.

तिची ओळख पटवली असता ती पारगाव येथील राहणारे नारायण आल्हाट यांची मुलगी रूपाली होती. साधारण या मुलीचे वय 18 च्या दरम्यान सांगितले. मात्र, मृत्यूचे कारण अद्यापही समजू शकले नाही. त्यानंतर रूपालीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणला होता. रात्री उशिरापर्यंत त्याचे शवविच्छेदन करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर रात्री उशिरा आकस्मिक मृत्यूची नोंद श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल पठारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)