श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे भाविक भक्तांची गर्दी

जुन्नर- संकष्ट चतुर्थी निमित्त आज (रविवारी) श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. भाविक भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. लेण्याद्री परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पहाटे 4 वाजता देवस्थान ट्रस्टचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, विश्‍वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, संजय ढेकणे, भगवान हांडे व कर्मचारी तसेच भाविक उपस्थित होते.

श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 6 व दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली. रविवारच्या सुट्टीमुळे भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. देवस्थान ट्रस्ट मार्फत भाविकांना विविध सेवा पुरविण्यात आल्या. दर्शन मार्गावर भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. सायंकाळी मंदिरात श्री मुक्ताई भजनी मंडळ, शिवेची वाडी यांचे भजन झाले. रात्री 10.14 वाजता चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी मोठया प्रमाणात भाविक मंदिरात उपस्थित होते. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.

दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कडक उन्हामुळे भाविकांनी दर्शनाकरीता सकाळी व सायंकाळी गर्दी केली होती. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जुन्नर व जुन्नर परिसर, पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक येथून भाविक श्रींच्या दर्शनासाठी येत होते. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर व सचिव शंकर ताम्हाणे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)